
दैनिक चालू वार्ता जव्हार प्रतिनिधी-दिपक काकरा.
हाकेच्या अंतरावर आदिवासी विकास विभागाचे कार्यालय
जव्हार:- नगर परिषद हद्दीतील डम्पिंग ग्राऊंड मध्येच छोटीसी झोपडी बनवून डम्पिंगच्या कचरा कुंडीत आदिवासी कातकरी समाजाचे सदु सखाराम नडगे त्यांची पत्नी संगीता नडगे,मुलगा रमन नडगे,मुलगी सानीका नडगे,रसीका नडगे हे कुटुंब मागील चार महिन्यापासून वास्तव करीत होते.ही बाब शिवसेनेचे पालघर जि.प.सदस्य प्रकाश निकम व सारीका निकम यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने प्रशासनाची कानउघडनी करत नडगे कुटुंबाचे स्थलांतर करण्यासाठी व्यवस्था करून दिली.
सविस्तर वृत्त असे की,निकम दाम्पत्य मोखाड्याहून पालघरकडे जिल्हा परिषद कार्यलयात कामानिमित्त निघाले असता जव्हारच्या बायपास रोडवर जव्हार नगर परिषदेचे कचऱ्याचे डम्पिंग ग्राऊंड आहे.यात त्यांच्या नजरेस एक व्यक्ती भरपावसात तेथील प्लास्टिक कचरा व भंगार शोधून जमा करत होता.त्याच्या सोबत त्याचा मुलगा व दोन लहान मुली सुद्धा त्यांना मदत करत होते.निकम यांनी तातडीने आपले वाहन तेथे थांबवून कुटुंबाची विचारपूस केली.त्यांना चांगल्या ठिकाणी स्थलांतर करण्यासाठी प्रशासनाला सूचना दिल्या व कुटूंबाला अन्न धान्य व कपडे खरेदीसाठी आर्थिक मदत देखील करत त्यांनी माणुसकी दाखवली.
यावेळी महादेव नडगे यांनी पोटाची खळगी भरण्यासाठी भंगार जमा करत असल्याची माहिती दिली.हे कुटुंब डम्पिंग ग्राऊंडच्या घाणीतच एका कच्या झोपडीत राहत होते.एका आदिवासी कातकरी समाजाच्या कुटूंब इतक्या घाणीत कसे राहत असेल असा प्रश्न निर्माण होत आहे.हाकेच्या अंतरावर आदिवासी विकास विभागाचे कार्यालय आहे असून या कार्यालयातून आदिवासी बांधवाकरिता करोडो रुपयांचा निधी त्यांच्या विकासावर,उदरनिर्वाहावर, मुलांच्या शिक्षणावर उपलब्ध करून दिला जातो.मात्र हे दुर्दैव पाहिल्यानंतर हा पैसा कुठे जातो असा सवाल आता उपस्थित होत आहे.
दरम्यान निकम यांनी जव्हारच्या तहसीलदार आशा तमखाडे व जव्हार नगर परिषदेचे अधिकारी नाईक यांना तातडीने बोलावून नडगे कुटुंबाचे चांगल्या ठिकाणी स्थलांतर करावे अशा सूचना दिल्या.
————————
ही बाब आदिवासी विकास विभागासाठी लाजिरवाणी घटना आहे.मी पीडित कुटुंबाला माझ्या कडून आर्थिक मदत दिलेली आहे, सदूच्या मुलींना शिक्षण प्रवाहात आणू त्यांना घरकुल मंजूर करून देणे,जो पर्यंत हे कुटुंब मुख्य प्रवाहात येत नाही तो पर्यंत त्याची सर्वस्वी जबाबदारी मी वैयक्तिक घेत आहे.
प्रकाश निकम,जि.प.सदस्य, पालघर
—————————-
या कुटुंबाचे तातडीने आम्ही स्थलांतर करत आहोत.कुटुंबाला तातडीने रेशन कार्ड देण्यात येईल.तसेच प्रकल्प अधिकाऱ्यांना या आदिवासी कातकरी कुटुंबाची माहिती देऊन योग्य ती उपाययोजना करण्यात येईल.
आशा तामखडे,तहसीलदार, जव्हार.