
दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा-
माझा कोरोगेटेड बॉवसेस व प्लास्टीक कंटेनर्स उत्पादनाचा कारखाना लोटे एम आय डी सी मधे होता , अन रहायला हिल व्हयू सोसायटी लोटे येथे होतो . विरंगुळा म्हणून काय धंद जोपासता येईल याचा विचार मनांत घोळत असताना गव्ह्याचे (दापोली ) अमृते मला भेटले त्यांनी गुलाब उद्यानाची संकल्पना मला सांगितली . मी ही निसर्गप्रेमी , बागवेडा असल्यामुळे ही कल्पना उचलून धरली , तेंव्हा मला गुलाबातला ग म भ न सुद्धा ठाऊक नव्हता . अमृतेच्या नर्सरी मधे अनेक प्रकारच्या गुलाबांची रोपे पाहिली . गुंठा दिड गुंठ्यात कसे गुलाब उद्यान करता येईल याचा अभ्यास सुरू केला . गुलाब लागवडीची माहिती देणारी पुस्तके आणली अन मग वेगवेगळ्या नर्सरींना भेटी द्यायला सुरवात केली , निवडून निवडून गुलाब रोपं आणली हो बाग देखणी करायची होती ना !मी मनाशी ठरवलं एका नजरेत बागेतली सर्व फुले दिसली पाहिजेत , त्यासाठी प्रथम मिनिएचर गुलाब , त्या मागे फ्लोरिबंडा व्हरायटीचे गुलाब , त्याचा मागे हायब्रिड टी व्हरायटीचे गुलाब अन अगदी शेवटी वेल गुलाब अशी लागवड केली . त्या प्रमाणे त्या त्या व्हरायटीची रोपे शोधायला सुरवात केली . ग्लॅडिएटर , अॅव्हॉन , जस्ट जॉय , फ्रेंडशीप , डबल डिलाईट , पॅरडाईज , समर स्नो , पापा मिलिंद , यंग मिस्ट्रेस , अभी सारिका , ब्लॅक लेडी , लॅंडोरा , सिटी ऑफ बेलफास्ट , व्हेटर टॅग , कडल्स , पर्ल डी अल कांडा , अहिल्या , ग्रीन रोझ , स्ट्रीप व्हरायटी , सिंगल पेटल असे एकशे वीस प्रकारचे गुलाब त्या बागेत लावले . तुम्हांला खरं वाटणार नाही तरी ही खरंच जॉन एफ केनडी , मिस्टर लिंकन , मार्गारेट मेरिल , पंडीत नेहरू , लाल बहाद्दूर शास्त्री अशी नेत्यांची नावे असलेले गुलाब एका लाईनीत लावले अन सारेच बिचारे काहीही राजकारण न करता गुण्या गोविंदाने नांदले . गाठ माझ्याशी होती ना !
हळू हळू हे गुलाब छान वाढू लागले , बाळसं धरू लागले . सुरवातीचे काही महिने कळी आली की खुडून टाकायला लागायची , वाईट वाटायचे पण झाडे मजबूत व्हायला पाहिजेत म्हणून मनावर दगड ठेऊन ते केले . आता त्यावर भरपूर फुले यायला लागली , त्यांची निगा व्यवस्थित घेत होतो ना I अगदी वेळेवर खतं औषध चालूच होती . बागेचं रूपांतर पालटलं , विविध रंगा ढंगांची अनेक फुलं फुलायला लागली . अत्यंत मनमोहक , सुगंध पसरविणारी ही बाग देखणी झाली . लोट्याचा माळ त्यात इंडस्ट्रीज त्यामुळे निसर्गाच्या बाबतीत भकासच होता . इतर उद्योजक संध्याकाळी बाग पहायला बागेत बसायला येऊ लागले अन माझा गप्पा मारण्यात वेळ ही जाऊ लागला , तेवढाच अधिकचा विरगुळा !
त्या नंतर कळलं की रोझ शो , गुलाबांच्या स्पर्धा ही होतात साधारणतः डिसेंबर जानेवारी महिन्यात . अस्मादिक त्याचा विचार करायला लागले अन सुरू झाला नवीन प्रवास . त्याचा अभ्यास केला , अमुक एकाच दिवशी प्रदर्शनात फुलं ठेवायची असतील तर प्रुनिंग केंव्हा केले पाहिजे , तोडल्यानंतर प्रदर्शनाच्या ठिकाणापर्यंत नेण्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे , गुण कशाच्या आधारावर दिले जातात . अन मग नवा उपक्रम सुरू झाला रोझ शो मधे सहभागी होण्याचा . खेड , दापोली , चिपळूण , रत्नागिरी अशा शहरांमधे प्रदर्शनात भाग घेऊन सलग तीन वर्ष किंग रोझ , क्वीन रोझ , कलर रोझेस , गुच्छानी फुले येणारे गुलाब प्रदर्शनात मांडून प्रत्येक ठिकाणी दहा पैकी किमान सहा सात बक्षिसं मी पटकावली . तीसरं वर्ष जेव्हा पुर्ण झालं तेंव्हा आयोजकांनी मलाच परिक्षक नेमलं म्हणजे मी भाग घेण्याचा प्रश्नच येणार नव्हता , अन बक्षिसं दुसऱ्या बागकरांना मिळणार होती . ते ही मोठ्या मनांनं मी स्विकारलं अन आयुष्यात गुलाब परिक्षणाचा निरिक्षक झालो , हे ही नसे थोडके ! ओघा ओघांनी गुलाब लागवड कशी करावी , प्रदर्शनात बक्षिसे मिळविण्यासाठी काय प्रयत्न करावे लागतात यावर लेक्चर्स द्याययं काम आलं . असं सारं उत्साहात अन आनंदात चालू होतं .
कालांतराने मी माझा भागीदारीत असलेला व्यवसाय सोडून स्वतःचा नवीन व्यवसाय सुरू केला अन निगा घेणारा माळीच बागेतून गेल्यावर त्या बागेची अवस्था केळीचे सुकले बाग नसून निगराणी अशी झाली . मनोमन मला वाईट वाटले , कुठल्याही दिवशी पाहिलं तर त्या बागेत किमान एक हजार गुलाब पुष्पे असायची . निर्मितीत आनंद मिळतो अन बिघडण्यात अतीव दुःख !
गुलाब हे खरंच शानदार , दिमाखदार , वेगळाच तोरा असणार फूल आहे . स्वागतासाठी हातात गुलाबाचं फूल घेऊन आपल्यासाठी उभा असतो तेव्हा त्या स्वागताचा आनंदही गालावर गुलाब फुलल्यासारखाच असतो अन स्वाभाविकपणे कोटाच्या किंवा सफारीच्या खिशात आपण खोचून दिमाखात मिरवत असतो ! खरं ना ?
सुनिल चिटणीस
03 / 07 / 2019