
दैनिक चालू वार्ता गंगापूर प्रतिनिधी-सुनिल झिंजूर्डे पाटील
गंगापूर – मराठा आरक्षण मिळवण्यासाठी कुठलाही राजकीय पक्ष प्रामाणिक नसल्यामुळे लाखोंचे मोर्चे व ४२ जणांनी बलिदान देउनही समाजाच्या हाती काही लागले नसून यापुढे टिकणारे आरक्षण मिळवायचे असेल तर ते ओबीसीतून किंवा आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांपेक्षा अधिक वाढवूनच मिळू शकतो यादृष्टीने पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्याचा निर्णय राज्य समन्वयकांच्या बैठकीत घेण्यात आला.
कायगाव येथील रामेश्वर मंदिर परिसरात स्व. काकासाहेब शिंदे यांच्या पुण्यतिथीनंतर राज्यभरातून आलेल्या समन्वयकांच्या उपस्थितीत झालेल्या चिंतन परिषदेत आरक्षणासह विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी भाजप,सेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांनी मागील काळात दिलेले आरक्षण टिकावू नव्हते व तशा प्रकारचे आरक्षण यापुढे नको कायदेशीर व टिकणारे आरक्षण मिळेल यादृष्टीने समन्वयकांनी आंदोलनाची दिशा ठरवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
ओबीसीतून आरक्षण द्यावे
या बैठकीमध्ये मराठा समाजाच्या प्रमुख समन्वयकांनी नुकत्याच जाहीर झालेल्या बांठिया आयोगातील अहवालानुसार ओबीसी समाजाच्या लोकसंख्येची टक्केवारी ३७ असल्याचे समजल्यामुळे ओबीसीतून १२ टक्क्यांपर्यंत आरक्षण मिळू शकते असा दावा करून त्यासाठी विद्यमान सत्ताधाऱ्यांनी व विरोधकांनी एकमेकांवर चालढकल न करता आरक्षणासंदर्भात प्रामाणिकपणे निर्णय घेतल्यास आरक्षण मिळू शकते असे सांगितले.
५० टक्के मर्यादा उठवावी
मराठा समाजाला आरक्षणासाठी जे दोन पर्याय आहेत त्यामध्ये सध्या राज्य व केंद्रात एकाच विचाराचे सरकार असल्यामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी पंतप्रधानांकडे जाउन ५० टक्क्यांची मर्यादा उठवण्याबाबतचा निर्णय घेण्यास सांगून त्याप्रमाणे कार्यवाही केल्यास आरक्षणाचा विषय सहज सुटू शकतो त्यासाठी राज्यातील समन्वयकांनी संबंधितांचा पाठपुरावा करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
मराठा समाजासाठी सुरू करण्यात आलेल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ व सारथी या संस्था कार्यक्षमपणे चालण्यासाठी व त्यांचा फायदा समाजातील अधिकाधिक तरूणांना होण्यासाठी त्यांना देण्यात येत असलेला निधी अतिशय अल्प असून तो इतर महामंडळांप्रमाणे लोकसंख्येच्या प्रमाणात देण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.
गंगापूर तालुक्यातील कायगाव येथील आरक्षण आंदोलनातील स्व. काकासाहेब शिंदेंच्या बलिदानापासून आरक्षण विषय ऐरणीवर आल्यामुळे या ठिकाणी शिंदे यांच्यासह मराठा आरक्षण आंदोलनातील ४२ हुतात्मा झालेल्या युवकांच्या स्मृतिप्रित्यर्थ स्मारण उभारण्यात यावे यासाठी सध्याच्या जागेशेजारी गोदाकाठावर जागा उपलब्ध करून देउन निधी देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
= गुन्हे मागे घेण्यात यावेत =
कायगाव येथे २३ जुलै २०१८ मध्ये झालेल्या आंदोलनामध्ये अनेक निरपराध युवकांवर गुन्हे दाखल झालेले असून तीन वेळच्या मुख्यमंत्र्यांनी मागे घेण्याचे आश्वासन व निर्णय होउनही अद्याप ते मागे घेण्यात आलेले नाही त्यामुळे त्यांच्यासह राज्यातील इतर ठिकाणच्या आंदोलनातील गुन्हे मागे घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी मराठवाड्यासह अहमदनगर व राज्यभरातील राज्य समन्वयकांची उपस्थिती होती.
यावेळी ९ आगस्ट क्रांतीदिनी औरंगाबाद येथे राज्य समन्वयकांच्या बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.