
दैनिक चालू वार्ता परभणी प्रतिनिधी- दत्तात्रय वामनराव कराळे
पूर्णा पंचायत समितीचे माजी उपसभापती माधव कदम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समर्थन दिल्यामुळे पूर्णा तालुक्यासह गंगाखेड मतदार संघातील राजकारणात प्रचंड खळबळ माजली आहे.
महाराष्ट्र राज्यात सुरु असलेली उलथापालथ व बदलेले राजकीय समीकरण अनेकांना भूवया उंचावणारे ठरले जात असल्याचे सर्वश्रुत आहेच शिवाय संघटनात्मक आणि न्यायालयीन स्तरावर आजी-माजी मुख्यमंत्र्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घमासान सुरु आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मध्ये “शिवसेना आमचीच” या विषयावर अटीतटीची लढाई सुरु आहे. खासदार, आमदार, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते फोडाफोडी करुन आमचेच प्राबल्य अधिक प्रमाणात असल्याचे दोन्हीही बाजूने अगदी तारेवरची कसरत असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान माधव कदम यांनी नुकताच आपल्या सहकार्यांसह मुंबईत जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नुकतीच भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनीही कदम यांचे मनस्वी स्वागत केले.
परभणी जिल्ह्यात खासदार व आमदार हे दोघेही शिवसेनेचेच आहेत. अभेद्य असा भगवा राजकीय बालेकिल्ला समजले जाणार्या परभणी जिल्ह्याला माधव कदम यांनी सुरुंग लावत शिंदेशाहीला कवटाळल्याने भविष्यात पूर्णा, गंगाखेड आणि परभणी जिल्ह्याची राजकीय समीकरणे बदलली जातील की काय, अशीही चर्चा आता जोर धरु लागली आहे. एक ऑगस्टच्या न्यायालयीन आणि आठ ऑगस्टच्या केंद्रीय निवडणूक आयुक्तांच्या निर्णयानंतर पुढील राजकीय स्थिरता, अस्थिरता किंवा आणखी कोणती समीकरणे कोणती दिशा घेतील हे दिसून येणार आहे. तोपर्यंत तरी इकडून तिकडे आणि तिकडून इकडे उड्या मारण्याचा लपंडाव सुरुच राहील एवढे मात्र खरे .