
दैनिक चालू वार्ता पालघर प्रतिनिधी:- अनंता टोपले
जव्हार– जिल्हा परिषद अध्यक्ष वैदही वाढाण व जिल्हा परिषद उपाध्यक्ष ज्ञानेश्वर सांबरे यांनी जव्हार मोखाडा तालुक्यातील शाळांना भेटी देत शिक्षण विभागाचा जोरदार आढावा घेतला आहे.यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश निकम देखील उपस्थित होते.
जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी जव्हार तालुक्यातील तळ्याचापाडा येथील शाळेला भेट देत विद्यार्थ्यांची प्रगती तपासली असता ती असमाधानकारक व खुपच कमी असल्याचे आढळल्याने या वेळी दोनही पदाधिका-यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली.विद्यार्थ्यांच्या वह्या तपासल्या असता विद्यार्थ्यांनी सोडवलेली गणिते चुकीचे असल्याचे सुध्दा त्यांना आढळून आले आणि शिक्षक विद्यार्थ्यांच्या वह्या देखील तपासत नसल्याचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या निदर्शनास आले आहे.तर विद्यार्थी शाळेत गैरहजर असतांना त्यांची हजेरी लावल्याचे सुद्धा अतिशय भयंकर वास्तव यावेळी निदर्शनास आले.
तीच परिस्थिती तालुक्यातील कापरीचापाडा येथे आढळुन आली आहे.शाळेत विद्यार्थी गैरहजर असतांना त्यांची प्रत्यक्षात हजेरी लावण्यात आल्याची माहिती त्यांच्या निदर्शनास आली आहे. विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती असमाधानकारक आढळून आली आहे.विद्यार्थ्यांना वाचन येत नसल्याचे यावेळी दिसून आले.
तर कुंडाचापाडा या शाळेला भेट दिली असता निरोप समारंभ व मुख्याध्यापक सहविचार सभेचे कारण सांगत सकाळी दहा वाजता जिल्हा परिषद शाळा सोडून दिली असल्याची माहिती तेथे फिरत असलेल्या विद्यार्थ्याकडून अध्यक्ष व उपाध्यक्ष यांना मिळालेली आहे. या सहविचार सभेला केळघर, राजनपाडा,सुळ्याचा,पाडा,धारणपाडा,न्याहाळे खुर्द, तळ्याचापाडा,नंदनमाळ,शिवा कोरड्याची मेट,करोळ पाडा आणि कुंडाचापाडा या जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक हजर होते.
तर कुंडाचापाडा शाळेत भेट दिली असता एक शिक्षक गैरहजर असल्याचे सुद्धा अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या निदर्शनास आले आहे.
या भेटी दरम्यान समोर आलेल्या वास्तवाच्या अनुषंगाने वैदेही वाढाण व ज्ञानेश्वर सांबरे व जि प सदस्य प्रकाश निकम यांनी असे प्रतिपादन केले आले आहे की,आदिवासी विद्यार्थ्यांची शैक्षणिक हेळसांड कदापि सहन केली जाणार नाही.जिल्ह्यातील आदिवासी व गोरगरिबांच्या मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आम्ही कटीबद्ध असुन जर कोणी हलगर्जीपणा करून त्यांचे शैक्षणिक नुकसान करु पाहत असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.कुणाचीही गय केली जाणार नाही.
कोरोना काळातील शैक्षणिक नुकसान भरुन काढण्यासाठी अधिकची मेहनत घेण्याचे आवाहन यावेळी जि प अध्यक्ष वैदेही वाढाण व जि प उपाध्यक्ष ज्ञानेश्वर सांबरे यांनी जिल्ह्यातील शिक्षकांना केले आहे.पालघर जिल्ह्यातील डोंगरकपारीतील,तळागाळातील आदिवासींची,गोरगरीबांची मुले देशाच्या पटलावर चमकतील या भूमिकेतून शिक्षकांनी अध्यापन करा त्यातच आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींना समाधान आहे असेही यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले आहेत.
भेट दिलेल्या शाळेतील शिक्षकांना जि प अध्यक्ष,जि प उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती, पंचायत समिती सभापती माहीत नसतील तर ही चिंतेची बाब असुन जर त्यांचेच जनरल नॉलेज अपडेट नसेल तर ते विद्यार्थ्यांचे जनरल नॉलेज कसे वाढवतील.
जिल्हा परिषद अध्यक्ष सौ.वैदेही ताई वाढाण
*जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री.ज्ञानेश्वर सांबरे*