
दैनिक चालू वार्ता निलंगा प्रतिनिधी -राहुल रोडे
दुबार पेरणीसाठी बाजारातून बियाणे खरेदी केले होते. मात्र, सततच्या पावसामुळे पेरणी करता आली नाही.
औराद शहाजानी (जि. लातूर) : निलंगा तालुक्यातील जामगा येथील बालाजी रवींद्र बिरादार (४५) या शेतकऱ्याने नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून सोमवारी (दि. २५) रात्री राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
बालाजी बिरादार यांनी आपल्या तीन एकर शेतात खरिपाची पेरणी केली होती. सततच्या पावसामुळे व गोगलगायीचा प्रादुर्भाव होऊन पिकाचे नुकसान झाल्याने दुबार पेरणी करण्याची वेळ आली होती. दुबार पेरणीसाठी बाजारातून बियाणे खरेदी केले होते. मात्र, सततच्या पावसामुळे पेरणी करता आली नाही. यातच संसाराचा गाडा कसा चालवावा या चिंतेने त्यांनी सोमवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली.
याप्रकरणी औराद शहाजानी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल गिते करीत आहेत. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले, मुलगी असा परिवार आहे.