
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी -शाम पुणेकर.
पुणे : ‘संयम’ ( सेल्फ अवेअरनेस इन युथ फॅार अँटी ॲडिक्शन मोटिव्ह) प्रकल्पांतर्गत शहरातील सत्तरहून अधिक शाळांतील बारा हजार विद्यार्थ्यांना व्यसन परावृत्तीचे धडे देण्यात आले आहेत. ताराचंद रामनाथ राठी ट्रस्ट आणि ज्ञान प्रबोधिनी प्रज्ञा मानस संशोधिकेने राबविलेल्या संयम प्रकल्पांतर्गत विद्यार्थ्यांमध्ये व्यसनापासून दूर राहण्यासाठी सखोल असे विशेष जाणीव जागृती शिक्षण देण्यात आले आहे, अशी माहिती ज्ञान प्रबोधिनी संशोधन संस्थेच्या संचालिका डॉ. अनघा लवळेकर आणि ट्रस्टचे दर्शन मुंदडा यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
लवळेकर म्हणाल्या की, ताराचंद रामनाथ सेवा ट्रस्ट आणि ज्ञान प्रबोधिनी संशोधन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने संयम प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून तयार केलेल्या अभ्यास संशोधन अहवालाचे रविवारी (३१ जुलै) प्रकाशन होणार आहे. मयूर काॅलनी येथील बाल शिक्षण मंदिर सभागृह येथे सकाळी दहा वाजता होणाऱ्या कार्यक्रमास महिला आणि बालकल्याण विभागाचे उपायुक्त राहुल मोरे उपस्थित राहणार आहेत.