
दैनिक चालू वार्ता परभणी प्रतिनिधी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यात कार्यरत ताडकळस पोलीस ठाणे अंतर्गत खडाळा शिवारात आढळलेल्या मयत तरुणाची ‘आत्महत्या’ नसून ती ‘हत्या’च असल्याचा छडा पोलिसांनी लावला आहे.
दैनिक चालू वार्ता ने याबाबत चे वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यावेळी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या मयत तरुणाने आत्महत्या केल्याची प्राथमिक नोंद दफ्तरी केली होती. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ माजली होती. परिणामी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत या घटने मागील सत्यता उजागर करण्यात यश मिळविले.
कृष्णा कदम नावाच्या २६ वर्षीय युवकाला ताडकळस पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या खडाळा परिसरात नेऊन तिघा इसमांनी हत्या केल्याचे पुढे आले आहे. बैलजोडी व चार चाकी वाहन विकत घेण्याच्या प्रकरणातून ती हत्या केल्याचे आरोपित तिघाही इसमांनी कबूल केल्याचे पोलिसांनी सांगितले.
पालम तालुक्यातील तीर्थापूर नामक खेड्यात राहणारा ह्या तरुणाचा गेम गावात किंवा आसपास करणे जिकीरीचे वाटत असावे म्हणून आरोपितांनी कृष्णाला सुमसान अशा खडाळा परिसरात आणून त्याचा अपघात झाल्याचा बनाव केला. त्यांच्या अंगावर गाडी घालून त्याचा काटा काढण्याचे दुष्कृत्य सदर आरोपितांनी केले असल्याचे कबूल केले परंतु नियती कोणालाही माफ करीत नसते. अखेर ताडकळस पोलिसांनी थर्ड डिग्री वापरत पोलिसी टाक्या दाखवताच आरोपितांनी सदरची हत्या आम्हीच केल्या कबूल केले. तथापि ह्या हत्येमागे कोण असावे, नि त्याचे कारण काय असू शकेल या व अशा अनेक प्रश्नांचा गुंता वाढला जाऊ नये तथा हे नाजूक प्रकरण अधिक चिघळता कामा नये यासाठी ताडकळस पोलिसांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करुन अवघ्या चारच दिवसांत या खूनातील आरोपींचा छडा लावून त्यांच्या मुसक्या आवळल्या.
सदर आरोपितांना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांच्या या कार्यशैलीवर परिसरात सर्वत्र आनंद व्यक्त केला जात आहे.