
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी : केंद्रे प्रकाश
डिजीटल साधनांच्या माध्यमातून वीज बिल व्यवहारांमध्ये गोवा देशात दुसऱ्या क्रमांकावर- वाय व्ही व्ही जे राजशेखर, ऊर्जा सचिव
केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्या ‘उज्ज्वल भारत-उज्ज्वल भविष्य’ अभियानाची सांगता
पणजी :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्ली येथून दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून ऊर्जा मंत्रालयाच्या ‘उज्ज्वल भारत-उज्ज्वल भविष्य- ऊर्जा @2045’ अभियानाच्या समारोप सोहळ्यात सहभागी झाले. याप्रसंगी पंतप्रधानांच्या हस्ते ऊर्जा क्षेत्रासाठी सुधारित वितरण क्षेत्र योजनेचा आरंभ आणि सौर रूफटॉप पोर्टलचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांनी लाभार्थ्यांशी संवाद साधला.
याच अनुषंगाने गोव्यात झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय नौवहन, बंदरे आणि जलमार्ग राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते गोवा विद्युत विभागाच्या डायनॅमिक क्यू आर कोड प्रणालीचा आरंभ करण्यात आला. ग्राहकांना वीज बिल अदा करण्यासाठी रांगा लावण्याची आवश्यकता नाही. वीज बिलावरील क्यु आर कोड स्कॅन करुन तात्काळ वीज बिल भरणा यामुळे सुलभ होणार आहे.
गोव्यात वीज क्षेत्रात आमुलाग्र परिवर्तन घडून येत आहे. भूमिगत वीज वाहिन्यांचे काम राज्यभर हाती घेण्यात येणार असल्याचे श्रीपाद नाईक म्हणाले.
गोवा डिजीटल व्यवहारात आघाडीवर आहे. वीज बिल अदा करण्यासाठीच्या डिजीटल व्यवहारांमध्ये गोवा दुसऱ्या स्थानी असल्याची माहिती राज्याच्या ऊर्जा खात्याचे सचिव वाय राजशेखर यांनी दिली.
केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्या ‘उज्ज्वल भारत-उज्ज्वल भविष्य’ अभियानाची आज सांगता झाली. या अभियानांतर्गत गोव्यात पेडणे, डिचोली, सांगे, काणकोण आणि पणजी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.