
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी -नवनाथ यादव
भूम:- तालुक्यातील माणकेश्वर मंदिर येथील पत्रलेखिकेचे हे शिल्प न जाणो कित्येक वर्षांपासून शेंदुराच्या थराखाली झाकलेले होते. माणकेश्वर मंदिराच्या शेजारीच सटवाई देवीचे मंदिर आहे. या मंदिराच्या दर्शनाला असंख्य भाविक येत असतात. सटवाई देवी लहान मुलांचे भविष्य पाटीवर लिहिते अशी अख्यायिका आहे. सटवाई देवी मंदिराच्या बाजूलाच असलेल्या चालुक्यकालीन असलेले मंदिर ज्यावरुन या गावाचेही नाव पडले आहे, असे माणकेश्वर मंदिराच्या बाह्यांगावर पत्रलेखिकेचे शिल्प आहे. सटवाई देवीच्या अख्यायीकेशी साम्य दर्शविणारे लेखिकेचे हे शिल्प समजून लोकांनी त्यावर शेंदूर लावण्यास सुरवात केली. वर्षानुवर्षे शेंदूर लावले जात असल्याने मूर्तीवर जाड थर तयार झाला. त्यामुळे अक्षरशः मूर्तीचे मूळ स्वरुपही पूर्णपणे झाकले गेले. काल दि. ४ ऑगस्ट २०२२ रोजी पुरातत्त्व विभाग, औरंगाबाद येथील अधिकारी मंदिराच्या पाहणीसाठी गेले असता, सदर प्रकाराबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. व मंदिर प्रशासन आणि गावकऱ्यांची समजूत काढून आपल्या गावात असलेल्या या प्राचीन व अतिशय महत्त्वपूर्ण अश्या वारश्याप्रती जागरूक होण्याबाबत गावकऱ्यांना आव्हान केले. ज्यास त्वरित प्रतिसाद देत मंदिर प्रशासन व गावकऱ्यांनी पुरातत्त्व विभागाचे सहाय्यक संचालक व अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थितपणे मूर्तीचा अंदाजा घेत हळूवारपणे मुर्तिवर असलेला सर्व शेंदूर काढला. यादरम्यान शिल्पावरील जवळपास तीन ते चार इंच जाडीचा शेंदुराचा थर काढण्यात आला. व अखेर या लेखिकेच्या शिल्पाने कित्येक वर्षांनी मोकळा श्वास घेतला.मंदिर संस्थान व गावकऱ्यांनी उर्वरित सर्व ठिकाणी लावलेला शेंदूर काढून परिसराची स्वच्छता करण्याची हमी देत यापुढे असा प्रकार होणार नाही याबाबत दक्षता घेण्याबाबतही आश्वासन दिले. यामुळे बऱ्याच पुरातत्त्व व इतिहास प्रेमींना समाधान मिळाले असेल. लवकरच माणकेश्वर मंदिराच्या स्थळ व्यवस्थापनाचा सविस्तर आराखडाही तयार करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल. या प्रसंगाच्या अनुषंगाने सर्व नागरिकांना आपल्या ऐतिहासिक वारश्याप्रती जागरूक होऊन त्यांचे जतन व संवर्धन करणेबाबत व आपल्या या वारश्यास कोणत्याही स्वरूपाची हानी होणार नाही याची दक्षता घेणेबाबत पुरातत्त्व विभाग आव्हान करत आहे.