
दैनिक चालू वार्ता परभणी प्रतिनिधी- दत्तात्रय वामनराव कराळे
“””””””””””””””””””””””””””””””””””””””””””
परभणी : जिल्हा पोलीस दलातील एका पोलीस हवालदाराने आपल्या कर्तव्यात जाणीवपूर्वक कसूर केल्याचा ठपका ठेवत त्याला शासकीय सेवेतून निलंबित केल्याचे आदेश काढून ते लागू झाल्याची माहिती पोलीस अधीक्षक जयंत मीना यांनी दिली आहे.
निलंबित हवालदाराचे नाव माधव तुकाराम आडे असून ते सोनपेठ पोलीस ठाण्यात कार्यरत होते. वरिष्ठांनी दिलेले आदेश, सांगितलेले निर्दैश जाणीवपूर्वक टाळणे, इतकेच नाही तर कर्तव्यात सतत दिसणारी बेशिस्त आणि बेजबाबदारपणा आणि कामचुकारपणा दिवसेंदिवस अधिकच वाढीस लागल्याचे वरिष्ठांच्या वारंवार निदर्शनास आल्याचे समजते. कर्तव्यात वारंवार केले जाणा-या चुका न सुधारता त्यामध्ये होणारी वाढ ही बेशिस्तीचा कळस ठरले जाणे स्वाभाविक असू शकते. परिणामी शिस्तीचे पालन न करता बेशिस्तीला ठरवून वाव देणे ही सुध्दा निलंबित होण्यामागची कारणे असू शकतात. बेशिस्तीचा कळस करणा-याला वेळीच पायबंद घालून संबंधितावर शिस्तीचा बडगा नाही उचलला गेला तर त्याचा गैरफायदा अन्य कोणीही घेऊ नये, हाच त्या निलंबना मागचा उद्देश असू शकतो.
पोलीस अधीक्षक श्री मीना यांनी पत्रकारांना माहिती देताना पुढे असेही सांगितले की, माधव तुकाराम आडे हे सेवा निलंबन काळात जिल्हा मुख्य कार्यालयातच कार्यरत राहातील असेही सूचित केले आहे.