
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी- शाम पुणेकर.
पुणे : कात्रज येथील कायम रहदारीचा असलेल्या शहराला जोडणाऱ्या संत खेतेश्वर चौक येथे कात्रज-कोंढव्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर मधोमध अनेक दिवसांपासून उच्च दाब विद्युत वाहक खांब वाकलेल्या स्थितीमध्ये असून तो कोणत्याही क्षणी कोसळण्याचा धोका आहे. मात्र, याकडे महावितरण विभागाचे दुर्लक्ष आहे. हा खांब चौकात कोसळल्यास विद्युत वाहकतारांमुळे मोठी दुर्घटना घडण्याचा धोका आहे. त्यामुळे हा धोकादायक खांब काढावा, अशी मागणी वाहन चालकांकडून करण्यात आली आहे.
मात्र, या चौकामध्ये कात्रज- देहूरोड बाह्यवळण रस्त्यावरून वंडर सिटी पासून कोंढवा रस्त्यावर उड्डाणपूल होत असल्याने या वाकलेल्या खांबाकडे दुर्लक्ष होत आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत हा खांब काढण्यात येईल, असे वाटत असल्याने महावितरणकडून याकडे दुर्लक्ष होत आहे, अशी नागरिक तक्रार करीत आहेत. मात्र, तोपर्यंत एखादे वाहन याला धडकून खांब कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
म्हणून महावितरण प्रशासनाने त्वरित हा खांब हलवावा अशी नागरिकांची अपेक्षा आहे.