
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई : महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन बुधवार १७ ऑगस्ट २०२२ पासून विधान भवन, मुंबई येथे सुरू होणार आहे. हे पावसाळी अधिवेशन गुरुवार २५ ऑगस्ट २०२२ पर्यंत चालणार आहे.
अधिवेशनाच्या नियोजीत कार्यक्रमात बदल करावा की नाही याचा निर्णय आवश्यकतेनुसार नंतर घेतला जाऊ शकतो. पण जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार पावसाळी अधिवेशन बुधवार १७ ते गुरुवार २५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत होणार आहे.
मुंबईत विधानभवन येथे विधानसभा आणि विधानपरिषद विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठका झाल्या. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रकांत पाटील, दादाजी भुसे, उदय सामंत, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधानपरिषद व विधानसभा कामकाज सल्लागार समितीचे सदस्य, विधानमंडळ सचिवालय प्रधान सचिव राजेंद्र भागवत उपस्थित होते.
पावसाळी अधिवेशनाच्या काळात शुक्रवार दिनांक १९ ऑगस्ट रोजी दहीहंडीची सुटी आणि दिनांक २० आणि २१ ऑगस्ट या दिवशी सार्वजनिक सुट्या आहेत. या दिवशी कामकाज होणार नाही. दिनांक २४ ऑगस्ट रोजी विधिमंडळ कामकाजात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
पावसाळी अधिवेशनाच्या आरंभी नव्या मंत्र्यांची ओळख करून देण्याचा कार्यक्रम सभागृहात पार पडेल. यानंतर नियोजनानुसार पुढील कामकाज होणार आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, निष्कलंक मंत्री या दोन मुद्यांवरून अधिवेशन काळात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात संघर्ष होण्याची शक्यता आहे. सर्व प्रश्नांना उत्तरे दिली जातील अशी भूमिका घेत राज्य शासनाने अधिवेशनाची तयारी सुरू केली आहे. अधिवेशनात साधकबाधक चर्चा करावी असे आवाहन सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना केले आहे.
याआधी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर जूनच्या अखेरीस एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. काही दिवसांतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने विधानसभेत विश्वासमताचा ठराव जिंकला. सरकार स्थापनेला एक महिन्यापेक्षा जास्त काळ झाल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि पावसाळी अधिवेशनाची घोषणा करण्यात आली. घोषणेनुसार बुधवार १७ ऑगस्ट २०२२ पासून पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे.