
दैनिक चालू वार्ता जिल्हा उपसंपादक- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी/पालम : अल्पवयीन मुले व पालकांमध्ये वाढीस लागलेली निष्क्रियता परिणामी अपघातांमध्ये होणारी लक्षणीय वाढ लक्षात घेऊन पालम पोलीस ठाण्याच्या वतीने नुकताच शिबीर आयोजित करण्यात आले होते. सदर शिबिरात पालम येथील दिवाणी न्यायालयाच्या न्यायमूर्ती व्ही. डी. शिरसे यांनी मौलिक मार्गदर्शन केले. त्यावेळी लक्षणीय उपस्थिती होती.
मोटार वाहन कायदेविषयक शिबिरात मौलिक मार्गदर्शन केले. वाहतुकीचे सर्व नियम अगोदर पासूनच कार्यरत आहेत, ज्याचा अंमल कटाक्षाने केला जातो. तथापि त्यात सन २०१९ मध्ये आमुलाग्र बदल करण्यात आला. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने जनजागृती वाढीस लागावी म्हणून कठोर प्रणाली अंमलात आणली. कायदा व कर्तव्य याकडे दूर्लक्ष न करता पालक व पाल्यांनी अगदी गांभीर्यान त्या प्रणालीचे पालन केले पाहिजे असे प्रतिपादन न्यायमूर्ती व्ही. डी. शिरसे यांनी केले.
न्या. शिरसे यांनी पुढे असेही सांगितले की, समाज जीवनात होणा-या अघटीत घटना व कायद्याची पायमल्ली होऊ नये असा त्या मागचा मूळ उद्देश होता.
पालम तालुका सेवा समिती व पालम पोलीस ठाणे यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या या शिबिरात पोलीस ठाण्याचे वपोनि प्रदीप काकडे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात असे सांगितले की, ज्या मुलांना वाहन चालवायला दिले जाते, त्यांचे वय, लायसन्स व नियमांचा विचार करणे आवश्यक आहे. कट मारणे, लायसन्स नसणे व नियमांचे उल्लंघन करणे या सारखे प्रकार कायदा विरोधी आहेत. याचा पाल्य व पालकांनीही गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे अन्यथा नाईलाजाने कारवाईचे शिकार बनले जातील असा सूचक इशारा देऊन श्री काकडे यांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले.
या प्रसंगी पालम तालुका सेवा समितीचे पदाधिकारी व पालम पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी या सर्वांनी आयोजित शिबिराच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. यावेळी पाल्य व पालकांची लक्षणीय उपस्थिती होती.