
एक- दोन नव्हे तर पोलिसांनी घातल्या तब्बल 19 अटी !
मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रमुख मनोज जरांगे पाटील बीड जिल्ह्यातील श्री क्षेत्र नारायण गड येथे दसरा मेळावा घेणार होते. हा मेळावा महानगरपालिका निवडणुकीच्या आधी होणार असल्याने याला विशेष महत्त्व देण्यात येत आहे.
मेळाव्यासाठी त्यांनी 22 सप्टेंबरला शिरुर (कासार) पोलिस ठाण्यात परवानगी मागितली होती. मात्र, दहा दिवस उलटून गेल्यानंतरही परवानगी मिळालेली नव्हती, त्यामुळे मराठा समाजात काहीशी साशंकता निर्माण झाली होती.
अखेर बुधवारी पोलिसांनी दसरा मेळाव्यास परवानगी दिली. परवानगी देताना पोलिसांनी 19 अटी घालण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रक्षोभक भाषणे होणार नाहीत, तसेच दोन समाजामध्ये तणाव निर्माण करणारे वक्तव्य केले जाणार नाही, अशी अट देखील आहे. या अटींचा उद्देश मेळाव्यादरम्यान कोणतीही हिंसक किंवा संवेदनशील परिस्थिती उद्भवू नये, यासाठी ठेवण्यात आला आहे.
परवानगी मिळाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मेळाव्यातून मराठा आरक्षणाबाबत काय बोलतील, याची उत्सुकता वाढली आहे. गेल्या दीड-दोन वर्षांपासून सुरु असलेला मराठा आरक्षणाचा लढा नुकताच यशस्वी ठरला आहे. महाराष्ट्र सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेत जीआर काढला असून, त्यानुसार मराठा समाजाला प्रमाणपत्रे वाटप सुरू झाले आहे. त्यामुळे मेळाव्यात मनोज जरांगे पाटील या संदर्भात काय भूमिका मांडणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, नारायण गडावरील दसरा मेळावा अवघ्या 24 तासांवर आलेला असताना मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती पुन्हा बिघडली आहे. तापाने फणफणलेले अंग आणि शरीरात असलेल्या कणकणीमुळे मनोज जरांगे पाटील यांना काल रात्री उशिरा छत्रपती संभाजीनगर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान नारायण गडावरील दसरा मेळाव्याला आपण कुठल्याही परिस्थितीत जाणारच परंपरा खंडित होऊ देणार नाही, असा निर्धार त्यांनी बोलून दाखवला आहे. यामुळे दसरा मेळावा आणि मराठा आरक्षणाच्या संदर्भात मनोज जरांगे पाटील काय भूमिका मांडतात, याकडे समाजाचे लक्ष लागले आहे.
पोलिसांनी घातलेल्या अटी
1) दसरा मेळावासाठी येणारे वाहणांसाठी पार्किंग ची पुरेशी व्यवस्था करावी. सदर ठिकाणी स्वयंसेवक नेमावेत.
2) पाकींग कडे जाणारे रोडवर बॅरीगेटस च्या ठिकाणी स्वयंसेवक नेमावेत.
3) श्रीक्षेत्र नारायणगड कडे येणाऱ्या सर्व रस्त्यावरील गावाचे ठिकाणी वाहतुक कोंडी होउ नये म्हणुन प्रत्येक ठिकाणी स्वयंसेवक नेमावेत.
4) श्रीक्षेत्र नारायणगड येथे येणाऱ्या चारही मार्गावर टोईंग व्हॅन ठेवावेत.
5) श्री. मनोज जरांगे पाटील यांचेसोबत सेभेसाठी येणारे कमीत कमी वाहने यांची निश्चिती करुन सदरची माहिती बंदोबस्त अधिकारी यांना आगाऊ द्यावी.
6) श्री. मनोज जरांगे पाटील यांचा मेळावा ठिकाणी येण्याचा व परत जाण्याचा मार्ग निश्चित करुन त्याबाबत बंदोबस्त प्रभारी अधिकारी यांना माहिती द्यावी.
7) मेळाव्यासाठी येणाऱ्या लोकांसाठी पुरेश्या पाण्याची व्यवस्था करावी.
8) मेळाव्यामध्ये प्रक्षोभक भाषण तसेच दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल असे वक्तव्य करणार नाहीत.
9) मा. सर्वोच्य न्यायालयाच्या ध्वनीक्षेपक बाबतचे नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.
10) मेळाव्या ठिकाणी लावण्यात येणाऱ्या LED सुरक्षीत अंतरावर लावुन विद्युत प्रवाहाची पुरेशी व्यवस्था करावी.
11) मेळाव्याच्या ठिकाणी असलेल्या स्टेजच्या बाजुची विद्युत पोल वरील विद्युत वाहिनी प्रवाह बंद करुन विद्युत रोहित्र च्या ठिकाणी स्वयंसेवक नेमुन त्यास हजर ठेवावे
12) आयोजकांकडून दसरा मेळाव्यासाठी येणारे लोकांना वाटप करण्यात येणाऱ्या अन्नातून बाथा होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी.
13) दसरा मेळावा कार्यक्रम संपन्न झाले नंतर स्वयंसेवक नेमलेल्या ठिकाणी गर्दी/वाहतुक कमी होई पावेतो हजर राहुन प्रशासनास सहकार्य करणे बाबत सुचना द्यावी.
14) दसरा मेळाव्यासाठी येणाऱ्या महिलांची व लहान मुलांची बसण्याची स्वतंत्र व सुरक्षीत व्यवस्था करावी.
15) श्रीक्षेत्र नारायणगड मंदीराचे परिसरात स्वयंसेवकांची नेमणुक करावी.
16) सध्या पावसाचे दिवस असुन श्रीक्षेत्र नारायणगडाकडे येणारी वाहतुक रस्ता बंद पडल्यास वाहतुकी संबंधी पर्यायी व्यवस्था बाबत आलेल्या भाविक भक्तांना आमचेशी समन्वय साधुन सुचना द्याव्यात.
17) आक्षेपार्ह /जातीय तेढ निर्माण होईल असे फोटो व मजकुर असलेले बॅनर लागणार नाहीत याची दक्षता घ्यावी.
18) दसरा मेळाव्या ठिकाणी आयोजीत करण्यात येणारे रावण दहन हे लोकांपासुन सुरक्षीत अंतरावर करुन सदर ठिकाणी सुरक्षीत अंतरावर स्वयंसेवकांची नेमणुक करावी.
19) दसरा मेळावा अनुषंगाने जास्तीत जास्त स्वयंसेवक नेमावेत.