
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाचा वाद दिवसेंदिवस चिघळत असताना, या प्रकरणी निर्णायक घडामोड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विमानतळास स्वर्गीय दि. बा.पाटील यांचे नाव देण्यासाठी येत्या ३ ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजता सह्याद्री अतिथिगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक पार पडणार असल्याची माहिती वनमंत्री आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी दिली आहे. नवी मुंबई महापालिकेचे माजी विरोधीपक्ष नेते दशरथ भगत यांनी गणेश नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या सेवा पंधरवड्याच्या समारोप समारंभावेळी गणेश नाईक यांनी ही माहिती दिली.
गणेश नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, “नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास स्वर्गीय दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी जो आग्रह धरला आहे, त्याची पूर्तता होण्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत ही बैठक होणार आहे, ,” असे नाईक यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. त्यामुळे या बैठकीत नामकरणाचा मुद्दा अंतिम करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावरून स्थानिक भूमिपुत्र आणि आगरी-कोळी समाजाने गेल्या काही दिवसांपासून आक्रमक भूमिका घेतली आहे. येत्या ८ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विमानतळाचे लोकार्पण होणार असल्याने नामकरणाच्या मुद्याला अधिकच महत्व प्राप्त झाले आहे.
ठाणे-बेलापूर पट्ट्यात हा वाद अधिकच पेटला असून, स्थानिकांच्या भावना तीव्र होत आहेत. नवी मुंबईतील ग्रामस्थांनी प्रशासनाकडून लावण्यात येणारे ‘नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानातळ’ या नावाचे दिशा दर्शक फकल उखडून काढले असून, जोपर्यंत विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव दिले जात नाही, तोपर्यंत कोणत्याही प्रकारचे फलक लावू देऊ नका असे आवाहन ग्रामस्थांकडून सर्वांना करण्यात आले आहे.
तर दुसरीकडे भिवंडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी देखील नामकरणाच्या प्रश्नाबाबत आक्रमक भूमिका घेतली असून, येत्या ६ ऑक्टोबर रोजी भूमिपुत्र संघटना आणि ग्रामस्थांसोबत विमानतळावर धडक मोर्चा काढण्याची तयारी सुरू केली आहे. विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव जाहीर न झाल्यास उद्घाटन रोखण्याचा इशारा या संघटनांनी दिला आहे.
या पार्श्वभूमीवर वन मंत्री गणेश नाईक यांच्या विधानामुळे या वादाला नवे वळण मिळाले आहे. विमानतळाच्या नामकरणाबाबत स्थानिक समाजाच्या भावना तीव्र असून, येत्या ३ ऑक्टोबरला होणाऱ्या बैठकीत याची घोषणा मुख्यमंत्री करणार का? नामकरणाच्या प्रश्नावर सरकारची भूमिका नेमकी काय असेल? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.