
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- कायद्याने बंदी असलेला गुटखा व पान मसाल्याची विक्री करणाऱ्या विरोधात अखेर जागी झालेल्या पोलिस आणि अन्न औषध प्रशासनाने धडक कारवाई सुरू केली आहे.संपूर्ण जिल्ह्यात सतत पोलीस प्रशासनाची गुटखा विरोधी मोहीम सुरू असतांना त्यांचा कुठलाच प्रभाव या गुटखा विक्रेत्यांवर दिसून येत नसल्याने जिल्ह्यातील अचलपूर पोलीसांनी कारवाही करत कासदपुरा येथील शे.बिस्मिल्ला शे.हनिफ या गुटखा विक्रेत्याच्या घरातून जवळपास १ लाख ७२ हजाराचा गुटखा जप्त करून ताब्यात घेण्यात आला.प्रतिबंधित असलेला गुटखा,पान मसाला,सुगंधित तंबाखूची शहर व परिसरात सर्रास विक्री केली जाते.चोरट्या मार्गाने शहरात हा माल विक्रीस आणला जात असून त्यामागे मोठे रॅकेट असल्याची चर्चा आहे.
गोपनीय मिळालेल्या माहितीच्या आधारावर २२ ऑगस्ट सोमवारी अचलपूर पोलीसांनी गुटखा विक्रीत्याच्या घरावर छापा टाकला असता यामध्ये नजर,पानबहार,हॉट,नागपुरी गुटखा असा एकंदरीत १ लाख ७२ हजाराचा माल शे.बिस्मिल्ला शे.हनिफ (वय वर्षे ५५) यांचे घरातून जप्त केला.सदर आरोपीवर कलम १८८,२६९,२७२,२७३ अन्वये अचलपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
सदर कारवाई ग्रामीण पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ,अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत सातव,उपविभागीय पोलीस अधिकारी नवगिरे,ठाणेदार माधव गरुड यांच्या मार्गदर्शनाखाली पुरुषोत्तम बावनेर,शे.मुजफ्फर,मोहन वावरे,अंकुश वानखडे,मंगल सवई यांनी यशस्वी केली.