
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर आणि महिलांच्या प्रश्नावरून केंद्रातील भाजपा सरकारवर टीका केली.
लाल किल्ल्यावरून भाषण करताना महिलांच्या आत्मसन्मानाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलले. पण त्याच दिवशी बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींना मुक्त केले गेले. हा महिलांचा सन्मान आहे का? असा सवाल शरद पवारांनी केला.
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकिल्ल्यावरून भाषण केले. त्यात त्यांनी महिलांच्या आत्मसन्मानाचा मुद्दा मांडला. तो योग्य होता. पण त्याच दिवशी गुजरात सरकारने बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींची मुक्तता करण्यात आली, असे परस्परविरोधी भूमिकेवर बोट ठेवत, शरद पवार यांनी, हा महिलांचा सन्मान आहे का, असा सवाल केला.
फेब्रुवारी 2002 साली गोध्रा येथे साबरमती एक्स्प्रेसच्या एका डब्याल आग लावण्यात आली होती. त्यानंतर गुजरातमध्ये जातीय दंगल उसळली होती. मार्च 2002मध्ये गर्भवती बिल्किस बानो हिच्यावर सामूहिक बलात्कार झाला होता. न्यायालयाने या प्रकरणातील 11 दोषींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली होती. 15 वर्षांपेक्षा जास्त काळ तुरुंगवास भोगल्यानंतर त्यांच्यापैकी एकाने त्याच्या मुदतपूर्व सुटकेसाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर सरकारने एक समिती स्थापन केली आणि त्या समितीने दिलेल्या शिफारशीनुसार त्यांची सुटका करण्यात आली. त्यावरून पवार यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. महिलांवर इतके अत्याचार केल्यानंतर गुजरातमधील सरकार या गुन्हेगारांना चांगली माणसे म्हणतं सोडून देते, अशी टीका त्यांनी केली.