
दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
“””””””””””””””””””””””””””””””””””””””””'”
परभणी/धारासूर : येथे प्राचिन व ऐतिहासिक असे गुप्तेश्वर महादेव मंदीर आहे. महाराष्ट्र राज्य सुरक्षित स्मारकाची जतन दुरुस्तीची व जीर्णोध्दाराची कामे ज्यांच्या वतीने केली जातात, त्या विभागाकडूही सदर मंदीर राज्य संरक्षित स्मारक म्हणूनही घोषित करण्यात आलेले आहे.
तथापि हेच प्राचीन गुप्तेश्वर महादेव मंदीर मोठ्या प्रमाणात ढासळले गेले आहे. ज्यामुळे ग्रामस्थ व समस्त भाविक भक्तांचे हे श्रध्दास्थान अत्यंत धोकादायक असे बनले गेले आहे. मंदीराची पडझड सुध्दा बऱ्याच अंशी झाली आहे. मंदीराचे शिखर पश्चिम बाजूला झुकले असून मंदीर व सभागृहाचा काही भाग अतिशय खिळखिळा व भग्नावस्थ बनला गेला आहे. सदरचे मंदीर हे समस्त भक्त गणांचे पवित्र स्थान असून ते कोणत्याही क्षणी कोसळले जाईल अशी बिकट परिस्थिती बनली आहे. दुर्दैवाने असे झाल्यास ऐतिहासिक असलेला हा धार्मिक ठेवा नष्ट होण्याचीही दाट शक्यता आहे.त्याबरोबरच सभोवताली असलेले असंख्य असे ग्रामस्थ व भाविक भक्तांना दर्शन दूर्लभ होईल यात शंकाच नसावी. शिवाय नुकसानही मोठ्या प्रमाणात होईल हा भाग वेगळा. या व अशा सर्वंकष बाबी लक्षात घेऊन ग्रामस्थांनी सदर मंदीराचा जीर्णोद्धार केला जावा यासाठी जिल्हा व राज्य प्रशासनाकडे फार पूर्वीपासूनच पत्रव्यवहार केलेला आहे.
मंदीराचे खस्ता हाल ध्यानी घेऊन विभागीय आयुक्तांच्या आदेशान्वये जिल्हाधिकारी परभणी, उपविभागीय अधिकारी, गंगाखेड, तहसीलदार, गंगाखेड, आणि गटविकास अधिकारी गंगाखेड आदी मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटी देऊन परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेतले व सभोवतालच्या ग्रामस्थांना मंदीराच्या सभोवताली वावरण्यास तीव्र मज्जाव केला आहे. तसा कटाक्षही ग्रामस्थांतर्फे घेण्यात आला आहे, ज्यामुळे होणारी मानवी हानी मोठ्या प्रमाणात टळली जावू शकेल .
समस्त भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदीराचा तात्काळ जीर्णोध्दार केला जावा यासाठी धारासूर ग्रामस्थ व ग्रामपंचायत कार्यालय, धारासूर यांनी जिल्हाधिकारी परभणी (पुरातत्व विभाग), तहसीलदार गंगाखेड, उपविभागीय अधिकारी गंगाखेड, गटविकास अधिकारी गंगाखेड यांच्याकडे बऱ्याच वर्षांपासून ती मागणी लावून धरली आहे. त्याशिवाय गंगाखेड विधानसभा रासपाचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनीही मुंबईत मंत्रालय येथे सर्वपक्षीय मंत्री महोदयांना भेटून वेळोवेळी निवेदने दिलेली आहेत. त्याचीच परिणीती म्हणून महाराष्ट्र राज्य पर्यटन व सांस्कृतिक विभागाचे मंत्रालयीन अवर सचिव यांनीही दखल घेऊन पुढील विषयांवर विचारणा केली आहे. ज्यामध्ये त्यांनी “गुप्तेश्वर महादेव मंदीराची पडझड झाली आहे का, सदर मंदीराच्या जीर्णोध्दाराची आवश्यकता आहे का, असेल तर, तात्काळ अंदाज पत्रक आराखडा प्रस्ताव तयार करून तात्काळ राज्य शासनाला सादर करावा”असे पत्र निर्देशीत केले. किंबहुना त्याच अनुषंगाने सहाय्यक संचालक, पुरातत्व विभाग, मुंबई यांनी पहाणी करून मंदीराविषयीचा अंदाज पत्रकीय आराखडा तयार केला व मुंबई, मंत्रालय येथील पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग येथे दाखल केला. एवढेच नाही तर गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे रासपा आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनीही मार्च २०२२ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात एल.ए.क्यू. दाखल करत लक्षवेधी तारांकित प्रश्न मांडून शासनाचे लक्ष वेधले आहे.
धारासूर येथील ग्रामस्थांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात गंगाखेडचे तहसीलदार यांना निवेदन देऊन गुप्तेश्वर महादेव मंदीर परिसरात आमरण उपोषण केले होते. किंबहुना त्याच उपोषणाची दखल घेऊन मंदीराविषयीच्या प्रकरणात लक्ष घालण्याचे निर्देश मिळाले होते. उपोषण सोडले जावे यासाठी उपोषणस्थळी जे अधिकारी आले होते त्यात महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व विभागाचे सहायक संचालक व जिल्हाधिकारी कार्यालय परभणी येथील वरिष्ठ अधिकारी, गंगाखेड तहसीलदार, गटविकास अधिकारी गंगाखेड आणि गंगाखेड विधानसभा मतदारसंघ रासपाचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांचा प्रामुख्याने समावेश होता. या कामी आ. गुट्टे यांनी समर्थनीय अशीच भूमिका बजावत कार्य सिद्धीस कसे नेता येईल जणू याबाबतचे सिंहावलोकन केले आहे, असं म्हटलं चुकीचं ठरणार नाही.
मुंबई मंत्रालयातील पुरातत्व विभागाचे सहायक आणि पर्यटन व सांस्कृतिक विभाग येथे दाखल असलेल्या अंदाजपत्रकीय प्रस्तावास प्रशासकीय मान्यता आणि निधी लवकरात लवकर मंजूर करवून घेणे अत्यंत आवश्यक आहे. ज्यामुळे गुप्तेश्वर महादेव मंदीराचा जीर्णोध्दार शीघ्र गतीने करणे शक्य होईल. आगामी अधिवेशनात लोकभावनेशी निगडीत, पुरातन आणि पर्यटन विभागांबरोबरच धार्मिक सद्भभावनेशी ज्याची नाळ जोडली गेली आहे, अशा हा मंदीर जीर्णोध्दारही लवकर मार्गी लागला जाईल, यासाठी शासन-प्रशासन स्तरावरील सर्व अधिकारी आणि सन्माननीय लोकप्रतिनिधी यांच्या सहकार्याची नितांत आवश्यकता आहे.
सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणी तातडीने लक्ष घालून धारासूर ग्रामस्थ आणि हजारो भाविक भक्तांच्या सद्भावनेचा गांभीर्याने विचार करावा आणि गुप्तेश्वर महादेव मंदीराच्या जीर्णोध्दाराचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा अशी विनम्र प्रार्थना दैनिक चालू वार्ता हे भक्तांचे पाईक म्हणून करीत आहे.
पुरातत्व खात्याची उदासीनता
“”””””””””””””””””””””””””””””””””””””””
जिल्हा प्रशासनाने पाऊस कालीन संरक्षणासाठी म्हणून रुपये दोन लाखांचा निधी जो पुरातत्व खात्याकडे वर्ग केला आहे, त्यातून तात्काळ ताडपत्र्यांची उपलब्धता करणे गरजेचे होते परंतु वर्ग झालेला निधी मंदीराच्या पाऊस कालीन सुरक्षेसाठी उपयोगात आणला जावा अशी मानसिकताच नसल्याचे पुरातत्त्व खात्याच्या उदासीनतेतून दिसत आहे. शासनाने यातही लक्ष घालून पुरातत्व खात्याला तसे तातडीचे निर्देश द्यावेत अशी मागणी भक्तगणांकडून पुढे येत आहे.
मंत्री मंडळ बैठकीतच निर्णय अपेक्षित
**************************
अधिवेशनाचा कालावधी सध्या तरी अनिश्चित कालीन असल्याने मंत्री मंडळाच्या होणाऱ्या विशेष बैठकीत गुप्तेश्वर महादेव मंदीर जीर्णोध्दाराचा विषय घेणे अपेक्षित आहे. तसे झाल्यास अपेक्षित निधी मंजूरीला लवकर चालना मिळून सदरचा जीर्णोध्दार हा विषय प्रगती पथावर येऊ शकेल यात तिळमात्र शंका नसावी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री मंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार व अर्थखात्याने या कामी पुढाकार घेऊन धार्मिक सद्भभावनेशी जोडला गेलेला हा प्रश्न कायमचा मार्गी लागावा अशी अपेक्षा आहे.