
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
पुणे : राज्यात काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाचे गुरुवारपासून पुनरागमन होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. अरबी समुद्रात मान्सूनसाठी पोषक वातावरण तयार झाल्याने आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.
त्यामुळे पश्चिम किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने मान्सूनचे पश्चिम वायव्यदिशेने वाटचाल सुरू आहे. तसेच अरबी समुद्रात मान्सूनसाठी पोषक वातावरण तयार झाल्याने आठ सप्टेंबरनंतर राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. राज्यातील पश्चिम किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे.
पश्चिम किनारपट्टीवरील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग आणि मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, कोल्हापूरमध्ये 8 ते 10 सप्टेंबर रोजी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील परभणी, नांदेड, हिंगोलीमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये अति मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. शहरात मंगळवारी दुपारी तीननंतर सुमारे अर्धा तास जोरदार पाऊस झाला. त्यामुळे गणपती दर्शनासाठी आलेल्या भाविकांची तारांबळ उडाली. तर, सायंकाळनंतर शहर-उपनगरांत बऱ्याच ठिकाणी सरी सुरू होत्या. शहरात पुढील चार दिवस मध्यम, तर घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. गुरुवारनंतर यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.