
दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या परभणी जिल्हाध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार तथा नूतन विद्या समितीचे सचिव संतोष धारासूरकर यांची तर परभणी महानगराध्यक्ष पदी ज्येष्ठ अस्थिरोग तज्ज्ञ तथा बालविद्या मंदीर शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. विवेक नावंदर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या घटनेनुसार जिल्ह्याच्या भौगोलिक क्षेत्राबरोबरच महापालिका क्षेत्रालाही स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा देण्यात येऊन कार्यक्षेत्र व शैक्षणिक क्षेत्राचा समतोल राखण्याचे काम या माध्यमातून केल्याचे दिसून येत आहे.
जिल्हा कार्याध्यक्षपदाची जबाबदारी उदय देशमुख यांच्यावर सोपविली गेली आहे. सूर्यकांत हाके उपाध्यक्ष पदी तर बळवंत खळीकर यांची सचिवपदी वर्णी लावली जाऊन बाकीची कार्यकारिणी मागीलप्रमाणेच कार्यरत ठेवली आहे.
महामंडळाचे सहकार्यवाह म्हणून जबाबदारी सांभाळणारे माजी आमदार तथा ॲड. विजय गव्हाणे यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले आहेत. या निवडीबद्दल सदर पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आगामी दोन ऑक्टोबर २२ रोजी सांगली येथे या शैक्षणिक महामंडळाचे राज्यव्यापी महाअधिवेशन होणार असल्याने त्याविषयी सुध्दा जोमाने तयारी करणे जरुरीचे असणार आहे.