
दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी-दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : पूर्णा तालुक्यातील धनगर टाकळी येथे कायदा धाब्यावर बसवून केला जात असलेला बालविवाह तात्काळ रोखून संबंधितांवर कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे. विशेष म्हणजे “बालविवाह रोखणे ही काळाची गरज असूनही जागोजागी कायद्याचे विनादिक्कत कायद्याचे उलंघन करुन तो वेशीला टांगण्याचा खुलेआम प्रयत्न केला जात आहे.
जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी काही आठवड्यापूर्वीच पालम येथे याविषयी केलेले मार्गदर्शन कोणाच्या टाळक्यात बसले नसावे की, जाणीवपूर्वक ते सुपीक टाळक्यानेच टाळले जात असावे, याचा प्रत्यय कठोर व प्रखर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला यावरच कळून येऊन शकेल एवढे नक्की.
चाईल्ड लाईन टीम व गोपनीय पथकांद्वारा प्राप्त माहितीनुसार पूर्णा तालुक्यातील धनगर टाकळी येथे एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह करण्याचा घाट घातल्याचे दि. २५ सप्टेंबर २२ रोजी समजले.
जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कैलास तिडके यांनी यांनी ग्रामसेवक आर.डी. झिरडकर, अंगणवाडी सेविका सुशीला पांचाळ, सरपंच व उपसरपंच आदींच्या पथकाला सोबत घेऊन तातडीने घटनास्थळ गाठले व नियोजित बालविवाहाचे कृत्य हाणून पाडले. चाईल्ड लाईन चे टीम मेंबर संदीप बेंडसुरे, सय्यद इशरत, राणी गरुड, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश पंडीत, बीट जमादार कैशर गील, व पो. कर्मचारी, गजानन पटवे या सर्वांनी मिळून कायदेविषयक कारवाई ची प्रक्रिया पूर्णत्वासाठी मुलीचे पूर्ण नाव, विवाहाचे स्थळ आणि मुलीच्या वयाच्या पुरावा यासंबंधीची पडताळणी करत त्यासंबंधीचे कागद-पत्र हस्तगत केले. सर्वांसमक्ष पंचनामा व अन्य कारवाई केली गेली. या कारवाईमुळे धनगर टाकळी व परिसरात आणि तालुक्यात सर्वत्र प्रचंड खळबळ माजली गेली.
बालविवाह करणे, त्यास प्रोत्साहन देणे, घडवणे अथवा घडवून आणणे, माहिती असूनही ती लपवून ठेवत पाठीशी घालणे यांसारख्या गोष्टी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या व दंडात्मक कारवाईची शिकार ठरणाऱ्या आहेत. त्या अनुषंगाने जेथे कुठे बालविवाह करण्याचा घाट घातला जात असेल तर माहितगारांनी टोल फ्री क्रमांकावर अथवा जिल्हा स्तरीय महिला व बालविकास अधिकारी यांचेशी त्वरीत संपर्क साधण्याचे आवाहन कैलास तिडके यांनी केले आहे.