
दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : मागील कांही दिवसांपासून गुन्हेगारीच्या वाढत्या रेषोमुळे परभणी शहरातील कायदा व सुव्यवस्था कोलमडला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलीस यंत्रणेकडे बघण्याचा दृष्टीकोन जरी वेगळा दिसत असला तरी बहुतांश गुन्ह्यांतील आरोपींची केली जाणारी धरपकड ही सुद्धा जमेची बाजू आहे, हे नजर अंदाज करुन चालणारे नाही. एका बाजूला पोलीस यंत्रणेला आव्हान देणाऱ्या बऱ्याच घटना घडत असतांना दुसऱ्या बाजूला एटीएसच्या मदतीने एन्.ए.आय.द्वारा केले गेलेल्या धाडशी कारवाईमुळे मात्र परभणी व नांदेड शहरात सर्वत्र प्रचंड खळबळ माजली जाणे स्वाभाविक आहे. पहाटेच्या साखर झोपेवेळी झालेल्या कारवाईत तब्बल पांच जणांच्या मुसक्या आवळल्या गेल्या आहेत.
मुंबई-काळाचौकी येथील पोलीस ठाण्यात एन्.आय.ए.द्वारा नोंदवलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने करण्यात आलेली ही धरपकड मराठवाड्यातील औरंगाबाद, नांदेड आणि परभणी शहरांपर्यंत ही गुन्हेगारी पोहोचली असल्याचा अंगुलीनिर्देश करतांना दिसत आहे. तोच धागा पकडून एन्.आय.ए.ने अत्यंत गोपनीयता बाळगून ही धरपकड केल्याने लिप्त आरोपितांची साखर झोप तर कडवट केली आहेच शिवाय औरंगाबादसह नांदेड व परभणी शहरात ज्या परिसरात सदरचे कथित आरोपी वास्तव्य करीत आहेत, तेथेही प्रचंड खळबळ माजली आहे.
परभणी शहराच्या मध्यभागी भरवस्तीत लिप्त कथित आरोपी साखर झोपेत असताना भल्या पहाटे चौघांची धरपकड करुन ए.टी.एस. व एन्.आय.ए.ने सर्वांनाच चक्रावून टाकले आहे. दरम्यान. नांदेड मुक्कामी गेलेल्या पथकाने एकाच्या मुसक्या आवळल्या आहेत. परभणीतील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संस्थेशी निगडीत कथित चारही आरोपी असल्याचे सांगितले जाते आहे. अत्यंत गुप्तपणे केली जात असलेल्या ह्या चौकशीतील कथित आरोपींचे आणखी कोणा कोणाशी व कुठे कुठे धागे-दोरे जुळले असावेत का, यांचाही गुप्तपणे शोध घेतला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदरचे कथित आरोपी ज्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया नामक संस्थेशी जुळले गेले आहेत, त्या संस्थेची सुध्दा अन्यत्र कुठे आणि कोणाकोणाशी तार जुळली असावी का, यांचाही तपास अत्यंत गुप्तपणे केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून धरपकड केलेल्या सर्वच आरोपींना कोणालाही काहीही समजू न देता गुप्तस्थळी रवाना केले असून मुंबई ते नांदेड, परभणी व अन्य ठिकाणी असून चौकशी सुरू असल्याचे समजते. याचाच अर्थ या प्रकरणी बराच मोठा स्फोट होण्याची शक्यता असल्याचे दिसून येत आहे. या कारवाईत औरंगाबाद एक.टी.एस.ने एन्.आय.ए.ला खूपच चांगले सहकार्य केल्याची भूमिका पार पाडल्या चे समजते. एकूणच ही कारवाई कथित प्रकरणावरुन संपूर्ण मराठवाड्यातही प्रचंड खळबळ उडवून देणारी ठरु शकते की काय, जणू याचीही भीती व्यक्त केल्यास नवल वाटू नये.