
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
ठाणे : ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ आणि बदलापूर शहरातील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी काल सह्याद्री अतिथीगृहात विशेष बैठक पार पडली. सदर बैठकीत या दोन शहरांतील प्रलंबित प्रश्नांवर महत्वाचे निर्णय घेण्यात आले.
अंबरनाथ शहरातील जिल्हा परिषदेच्या शाळा नगर परिषदेकडे वर्ग करण्याबाबत येणाऱ्या अडचणी दूर करून त्यासाठी नगरविकास विभागाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करुन देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. त्यासोबतच अंबरनाथ येथील शिवमंदिराच्या लगत असलेल्या प्रकाश नगरचा एसआरएच्या माध्यमातून पुनर्विकास करणे, शिवाजी नगर मार्केटचा पीपीपी मॉडेलद्वारे पुनर्विकास करणे, अंबरनाथ रेल्वे स्थानकालगतच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाची जागा सॅटीस प्रकल्पासाठी देणे असे काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले.
बदलापूर शहरात पूररेषेच्या प्रश्नामुळे रखडलेल्या विकास प्रकल्पावर मार्ग काढण्यासाठी या पूररेषेचा पुन्हा आढावा घेण्याचा निर्णय देखील या बैठकीत घेण्यात आला. तसेच बदलापूर नगरपरिषदेने कोरोना काळात केलेल्या खर्चासाठी निधी देण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद देण्याचा निर्णय घेतला.
याप्रसंगी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, अंबरनाथचे आमदार डॉ.बालाजी किणीकर, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, अंबरनाथ नगर पंचायतीचे मुख्याधिकारी प्रशांत रसाळ बदलापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी योगेश गोडसे,
बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे, अंबरनाथ व बदलापूर शहरातील सर्व संबंधित पदाधिकारी उपस्थित होते.