
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- प्राचीन काळात “उदुंबरावती” नावाने प्रसिद्ध असलेले विदर्भातील छोटेसे गाव म्हणजेच आजचे अमरावती,विदर्भाची सांस्कृतिक राजधानी म्हणून प्रसिद्ध आहे.असे म्हणतात पूर्वी येथे उंबराचे घनदाट जंगल होते म्हणून गावाला “उदुंबरावती” असे नाव मिळाले.पुढे “उदुंबरावती” चे सोपे रूप उंबरावती,उमरावती व कालांतराने अमरावती असे नाव विख्यात झाले.अमरावती शहराला पौराणिक काळापासून विशेष महत्व प्राप्त झाले आहे.येथील श्री अंबादेवी व श्री एकवीरादेवी मंदिर सुप्रसिद्ध असून,विदर्भाची कुलस्वामिनी म्हणून अंबादेवी व एकविरादेवीच्या दर्शनास भाविकांची अलोट गर्दी असते.श्री जनार्दन स्वामी,श्री नारायण गुरु महाराज,संत गाडगेबाबा,संत तुकडोजी महाराज,संत गुलाबराव महाराज,संत मृगेंद्र शंकर स्वामी अशा संतांच्या पावन चरण स्पर्शाने अमरावतीचा लौकिक अधिकच वाढत गेला.पुढील काळात स्वातंत्र्यलढ्यातील महत्वपूर्ण घडामोडी,अमरावतीतील अनेक दिग्गज लोकांचे महान कार्य,नगराची सामाजिक तथा सांस्कृतिक वाटचाल यामुळे अमरावती नगरी नावारूपास आली.पूर्वी उमरावती जवळील कुंडीनपूर येथे यदू वंशातील भीष्मक राजाची राजधानी होती,देवी रुख्मिणी ही भीष्मक राजाची कन्या होती.रुख्मिणीने श्रीकृष्णाशी विवाह करण्याचे मनात योजिले मात्र तिच्या भावाने तिचे लग्न शिशुपालासोबत ठरविले होते.यातून मार्ग काढण्यासाठी रुख्मिणीने श्रीकृष्णाला पत्र लिहून अंबामातेच्या मंदिरातून आपले हरण करावे असे सुचविले.
लग्नापूर्वी रुख्मिणी अंबादेवीच्या दर्शनास
श्रीकृष्णाने अंबादेवी मंदिराच्या बाहेरूनच रुख्मिणीचे हरण केले असे अमरावतीच्या गौरवशाली इतिहासात नमूद केले आहे.तेराव्या शतकात श्री गोविंदप्रभू अमरावतीत आले असतांना त्यांनी रुख्मिणी हरणाचे स्थान पाहिले अशी ऐतिहासिक नोंद आहे,याआधारे श्री अंबादेवी मंदिर पौराणिक काळापासून अस्तित्वात आहे हे सिद्ध होते.अंबादेवीची मूर्ती पुरातत्व विभागाच्या अंदाजानुसार पाचहजार वर्षापेक्षा जास्त जुनी असावी.बेसाल्ट दगडापासून बनलेली ही मूर्ती स्वयंभू वाळूकामय असून दोन्ही हात मांडीवर विसावलेली,पद्मासनात आसनस्थ,अर्धोन्मीलित डोळे,शांत,गंभीर,ध्यानस्थ,चैतन्यमूर्ती आहे.दिवसात अनेकवेळा आपले रूप तथा भाव बदलणारी श्री अंबादेवी संपूर्ण साजशृंगारानंतर महिषासूराचा वध करायला निघालेल्या चंडिकेच्या रुपात देखील आपल्याला दर्शन देते.अत्यंत जागृत असे हे देवस्थान असून,विदर्भाची कुलस्वामिनी श्री अंबादेवीला अग्रपूजेचा मान आहे.वऱ्हाड प्रांतावर मौर्य,यादव अश्या अनेक राजघराण्यांनी राज्य केले.मूळ गाव उदुंबरावती इसवी सनाच्या अकराव्या शतकापासून अस्तित्वात होते असे पुरावे उपलब्ध आहेत.इ.स.१४९९ मध्ये उत्तरेकडील यवनांनी जेंव्हा वऱ्हाड प्रांत काबीज केला तेंव्हा अनेक मंदिरे उध्वस्त केली त्यात अंबादेवी मंदिराचा देखील समावेश होता.पुढे इ.स.१६६० च्या सुमारास श्री जनार्दनस्वामींनी या मंदिराचा जीर्णोधार केला असावा असा अंदाज व्यक्त केला जातो.सतराव्या शतकाच्या मध्यात इ.स.१६४० च्या सुमारास जनार्दनस्वामी अमरावतीत आले ते अंबादेवी मंदिराच्या लगत असलेल्या नाल्याच्या दक्षिण तीरावर पर्णकुटी बांधून राहू लागले.दररोज देवीची पूजा केल्यावरच अन्न ग्रहण करायचे असा त्यांचा नियम होता.एकदा पावसाळ्यात नाल्याला पूर आला व तीन दिवस पूर ओसरला नाही,स्वामींना तीन दिवस उपास घडला.तेंव्हा जगदंबेने त्यांना स्वप्नात दृष्टांत दिला व सांगितले की तुम्ही रोज ज्या विहिरीचे पाणी वापरता त्या विहिरीच्या वर जो बाण म्हणजेच पाषाण आहे तो मीच आहे,त्याची प्राणप्रतिष्ठा करा.जनार्दन स्वामींनी दृष्टांतात सांगितल्याप्रमाणे देवीची स्थापना व प्राणप्रतिष्ठा केली,हीच आपली म्हणजे एकवीरादेवी होय.
श्री अंबादेवीचे मूळ मंदिर पुरातन
१९ व्या शतकाच्या पूर्वार्धात अंबादेवीची मूर्ती एका छोट्याश्या हेमाडपंथी मंदिरात स्थानापन्न होती असे म्हणतात.जुने मंदिर कायम ठेऊनच पुढे मोठे मंदिर बांधण्यात आले आहे म्हणूनच आपल्याला मंदिराच्या आत मंदिर असे बांधकामाचे स्वरूप दिसते.अंबादेवी मंदिराच्या बांधकामावर दक्षिणात्य शिल्पकलेची छाप आहे.श्री अंबादेवी व महादेवाच्या शिखराचे बांधकाम १८९६ सालात करण्यात आले,१९०६ साली शिखरावरील तांब्याचे कळस सोन्याचा मुलामा देऊन नव्याने बसविण्यात आले.अंबामातेच्या मंदिराच्या गाभाऱ्याला लागूनच श्री गणपती व श्री हरीहराचे मंदिर आहे.मुख्य मंदिराच्या उत्तरेला श्री हनुमान मंदिर तसेच दुर्गामातेचे मंदिर आहे.मंदिराचा सभामंडपाचे छत काचेने मढवलेले असून खूपच देखणे दिसते.नवरात्र काळात भाविकांना दर्शन सोपे व्हावे म्हणून अंबादेवी मंदिरात आतून काही बदल केले आहेत मात्र बाहेरून जुने मंदिर तसेच आहे.
अंबादेवी व एकवीरादेवी मंदिराला जोडणारा पूल आता मोठा करण्यात आला असून एकविरा देवीचे भव्य मंदिर नव्याने बांधण्यात आले आहे.श्री एकवीरा देवीचे पूर्वीचे रूप आपल्या सर्वांच्याच डोळ्यात सामावलेले आहे मात्र काही वर्षांपूर्वी एकवीरेची खोळ पडून मूळ मूर्ती भाविकांसमोर आली. ही मूळ मूर्ती देखील अद्वितीय आहे,देवीचे नवे रूप देखील बघताक्षणी मन प्रसन्न करते.एकविरा देवी मंदिराच्या आत पायऱ्या उतरून गेल्यावर महादेवाचे तसेच श्री जनार्दन स्वामींचे दर्शन भाविकांना घडते.येथेच काचेच्या पेटीत ठेवलेली श्री विष्णूंची अत्यंत पुरातन मूर्ती आहे तसेच श्री गजानन महाराजांचे देखील दर्शन घडते.अंबादेवी व एकवीरादेवीला दर मंगळवारी,अमावस्या पौर्णिमेला तथा सणाच्या दिवशी संपूर्ण सुवर्णालंकार चढविले जातात ते देखणे रूप अनुभवण्यास भाविक आतुर असतात.रोज सकाळी सहा वाजता मंदिराचे मुख्य दार उघडले जाते,देवीची नित्यपूजा सकाळी सात वाजेपर्यंत पूर्ण होते.दररोज माध्याण्य समयी ठीक बारा वाजता पुरणपोळी तथा खीर नियमाने समाविष्ट असलेला महानैवेध्य देवीला अर्पण केल्या जातो.तत्पश्यात मुखशुधीस्तव देवीला तांबुल देण्यात येतो.एकविरा देवी संस्थानातर्फे कार्तिक महिन्यात,श्री जनार्दन स्वामी पुण्यतिथी उत्सवात अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
आश्विन शुद्ध प्रतिपदा,घटस्थापनेचा दिवस अमरावतीकरांसाठी आनंदाची पर्वणी घेऊन येतो.येथून दसऱ्यापर्यंतचे दहा दिवस संपूर्ण अमरावतीतील वातावरण चैतन्यमयी असते.दहाही दिवस जगदंबेची मनोभावे पूजा केली जाते,मंदिर परिसरात सर्वत्र मंगलमय वातावरण असते,नवरात्र उत्सवात दहाही दिवस देवीला संपूर्ण सुवर्णसाज चढविलेला असतो,या दहा दिवसात देवीच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी होते.नवरात्रातील अष्टमीला मंदिरात होम असतो,नवरात्राचे नऊ दिवस अंबाएकवीरेची मनोभावे पूजा झाली की दसऱ्याला एकाच पालखीतून अंबादेवी व एकवीरादेवी सिमोलंघनास निघतात.त्यांच्या पालखीच्या मागे श्री बालाजीचा रथ असतो.जगदंबेला सोने अर्पण करूनच अमरावतीतील भाविक दसऱ्याची सुरुवात करतात.दोन्ही संस्थाने हजारो वर्षाची प्रथा परंपरा सांभाळून दोन्ही देवींची यथासांग नित्यपूजा करतात,तसेच दोन्ही संस्थानात सर्व दिनविशेष देखील विशेषत्वाने साजरे केले जातात.इ.स.१९२८ च्या नझुल रेकॉर्ड मध्ये १००० वर्षांपासून हे मंदिर असल्याचे नमूद केले आहे,छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकाची पत्रिका अंबादेवीस आली होती असे म्हणतात.
विदर्भाची कुलस्वामिनी अंबादेवी व एकवीरादेवी सर्वांचे आराध्य दैवत
तिच्या आशीर्वादाने अमरावती ही विदर्भाची सांस्कृतिक राजधानी म्हणून प्रसिद्धीस आली.पूर्वीपासून कलाकार श्री अंबादेवीच्या चरणी आपली सेवा देतात याच अनुषंगाने २००५ पासून अंबादेवी संगीत महोत्सव सुरु करण्यात आला.या महोत्सवात अनेक दिग्गज कलाकार आपली सेवा देतात,अमरावतीतील रसिक श्रोत्यांसाठी हा संगीत महोत्सव आनंदपर्वणीच असतो.अंबादेवी व एकवीरादेवी संस्थानातर्फे पूर्वीपासून आजपावेतो सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात भरीव कार्य केले जाते.संस्थानातर्फे कीर्तन परंपरा जपत कीर्तन महोत्सव,भागवत सप्ताह,हरिपाठ,अनेक धार्मिक अनुष्ठाने,समाजोपयोगी विषयावर व्याख्याने,शास्त्रीय संगीताचे दर्जेदार कार्यक्रम आयोजित केले जातात.शिवाय वेळोवेळी येणाऱ्या सामाजिक उपक्रमात दोन्ही संस्थानांचा सक्रीय सहभाग असतो यामुळे देवीच्या आशीर्वादाने भरीव सामाजिक तथा राष्ट्रीय कार्य देखील घडते आहे.अंबादेवी संस्थानातर्फे संस्कृत महाविद्यालय चालविले जाते व यामुळे संस्कृत भाषेचे संवर्धन कार्य घडते आहे.वाचन संस्कृती वाढविण्यासाठी अंबादेवी संस्थानातर्फे इ.स.१९७० साली ग्रंथालय सुरु करण्यात आले,या ग्रंथालयाला १९७६ साली शासनमान्यता प्राप्त झाली.यानंतर ग्रंथालयाला अनुदान सुरु झाले व १९८० साली ग्रंथालयाची स्वतंत्र इमारत बांधण्यात आली.श्री अंबादेवी संस्थान व डॉ.जोशी ट्रस्ट हॉस्पिटल तर्फे गरीब रुग्णांची अत्यल्प दरात सेवा केली जाते,तसेच अनेक आरोग्य शिबिरे आयोजित केली जातात.एकविरा संस्थानातर्फे सुद्धा सध्या होमिओपॅथिक दवाखाना सुरु करण्यात आला असून अनेक लोकांना याचा लाभ होतो आहे.