
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा–
समाजाच्या विविध क्षेत्रांत उत्तुंग कामगिरी करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांचा सन्मान करणारा ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ हा पुरस्कार सोहळा मंगळवार, ११ ऑक्टोबर मुंबईत वरळी येथील एनएससीआय डोम येथे रंगला आहे.
या पुरस्कार सोहळ्याला महाराष्ट्रीतील अनेक दिग्गज व्यक्तींनी हजेरी लावली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , विख्यात अभिनेते नाना पाटेकर या सारख्या मंडळींंचा यात समावेश आहे. या पुरस्कार सोहळ्याला अभिनेता रणवीर सिंगनं हजेरी लावली. अभिनेता रणवीर सिंग याला सर्वोत्कृष्ट अभिनेता श्रेणीतील ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी रणवीर सिंगने नाना पाटेकर यांच्याकडे पाहून मी अभिनयाचे धडे गिरवल्याचे सांगितले.
अभिनेता रणवीर सिंगने पुरस्कार स्वीकारल्यानंतर तो म्हणाला की, मी महाराष्ट्राचा भाग असल्याचा मला खूप अभिमान आहे. माझे जन्मस्थान महाराष्ट्र आहे. ही माझी जन्मभूमी, मातृभूमी आणि कर्मभूमी आहे. मी आज जे काही आहे ते या महाराष्ट्रामुळेच आहे. माझे अस्तित्व या राज्यासोबत जोडले गेलेले आहे. मनोरंजनाच्या माध्यमातून आपल्या लोकांच्या सेवेसाठी नेहमीच तत्पर आहे. वयाच्या ८० व्या वर्षापर्यंत मी लोकांचे अविरत मनोरंजन करेन.
रणवीर सिंगनं नानांचे मानले आभार
तो पुढे म्हणाला की, मी नानांना पाहून अभिनय करायला शिकलो, आज त्यांच्या समोर मला हा पुरस्कार स्वीकारण्यात खरोखर अभिमान वाटतो. मला तुमचा खूप आदर वाटतो आणि आज मी तुमच्यासोबत मंचावर उभा आहे, त्यामुळे मी खूप खूश आहे. कलाविश्वाला तुम्ही दिलेल्या योगदानासाठी मी तुमचे आभार मानतो. क्रांतीवीर चित्रपटातील मला तुमची गाणी खूप आवडली होती. त्यावेळी त्याने नाना पाटेकर यांना विचारलं की तुम्हाला हा चित्रपट आठवतो का त्यावर नाना पाटेकर मजेशीर अंदाजात म्हणाले की, मुझे भुलना अच्छा लगता है… असं नानांनी म्हणताच सर्वांना हसू आवरलं नाही.
तुमचे चित्रपट नेहमी आमच्या मनात कायम घर करून राहतील. ते डायलॉग आणि गाणी. अशा आयकॉनिक अभिनेत्यासोबत आज मी मंच शेअर करतो आहे. याचा मला खूप आनंद आहे, असं यावेळी रणवीर म्हणाला.