
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा मतदार संघातील पोटनिवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागले आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत दोन गड पडल्याने मुंबईतील ही निवडणुक प्रतिष्ठेची लढाई बनली आहे.
ही निवडणुक जिंकण्यासाठी भाजप आणि शिंदे गटाने सर्व शक्ती पणाला लावली आहे. अंधेरी पोटनिवडणुकीसाठी सेना उमेदवार ऋतुजा लटके यांचा प्रचार देखील सुरु झाला आहे. त्यातच ठाकरे गटाचे शिवसेनेचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. BMC जॉबमुळे ऋतुजा लटके अडचणीत येणार आहेत.
ऋतुजा लटके या मुंबई महापालिकेच्या कर्मचारी आहेत. यामुळे त्यांना उमेदवारी अर्ज भरण्यात अडचण येण्याची शक्यता आहे.
ऋतुजा लटके यांनी महिनाभरापूर्वी आपल्या सेवेचा राजीनामा दिला आहे. ऋतुजा लटके यांचा राजीनामा महापालिका प्रशासनाने अजून मंजूर केलेला नाही.
जोपर्यंत ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर होत नाही तोपर्यंत त्या विधानसभा पोट निवडणुकीचा अर्ज भरू शकत नाहीत. अंधेरी पूर्व विधानसभा पोट निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 14 ऑक्टोबर आहे. यामुळे आता ठाकरे गटाकडे शेवटचे तीन दिवस हाती आहेत.
ऋतुजा लटके यांचा मुंबई महापालिका सेवेचा राजीनामा मंजूर करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब गटातील नेत्यांची धावाधाव सुरु आहे. ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर करुन घेण्यासाठी अनिल परब यांनी थेट महापालिका मुख्यालय गाठल्याचे समजते.
महापालिका नियमावलीनुसार कर्मचाऱ्याचा राजीनामा किंवा स्वेच्छा निवृत्तीचा अर्ज तो सादर केल्यापासून तीन महिन्यांत कधीही मंजूर केला जाऊ शकतो.
महापालिका सेवेचा राजीनामा मंजूर झाल्यास ऋतुजा लटके गुरुवारी 13 तारखेला आपला उमेदवारी अर्ज सादर करण्याची शक्यता आहे.
धेरी पूर्व मतदार संघातील शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचं निधन झालं आहे. त्यामुळे या जागेवर पोटनिवडणूक लागणार आहे. शिवसेनेनं रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा रमेश लटके यांना उमेद्वारी दिली आहे. तर, भाजपकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
या निवडणुकीसाठी 14 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारांना नामनिर्देशनपत्र भरता येणार आहेत. 3 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 6 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे.