
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :-वर्ष २०२० आणि २०२१ दरम्यान,महाराष्ट्र पोलीस विभागांतर्गत कार्यरत असलेल्या विविध शहर आणि ग्रामीण पोलीस विभागातील रिक्त पदांसाठी पोलीस महासंचालक,प्रशिक्षण आणि विशेष विभाग यांच्या कार्यालयामार्फत भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.त्याअंतर्गत या दोन वर्षात रिक्त राहिलेल्या सर्व पोलीस आयुक्त,पोलीस अधीक्षक आणि एसआरपीएफच्या कमांडोमध्ये पोलीस जवान आणि चालक पोलीस जवान पदांसाठी समांतर आरक्षण विषयीची माहिती मागविण्यात आली आहे.पोलीस महासंचालक (प्रशिक्षण व विशेष विभाग) संजय कुमार यांनी दिलेल्या पत्रानुसार,अमरावती शहर पोलीस आयुक्तालयात पोलीस जवान संवर्गाची २० पदे आणि चालक पोलीस जवान संवर्गाची २१ पदे गेल्या दोन वर्षांपासून रिक्त आहेत.
दोन वर्षांपासून रिक्त असलेल्या या पदांवर संयुक्त भरती करण्यासाठी पोलीस महासंचालक कार्यालयाकडून विहित नमुन्यातील समांतर आरक्षणाची माहिती मागविण्यात आली आहे.या पत्रात इतर सर्व शहरे आणि जिल्ह्यांसह लोहमार्ग पोलीसांमध्ये गेल्या दोन वर्षांत वार्षिक आणि संवर्गातील रिक्त पदांचा तपशील देखील देण्यात आला आहे.तसेच एकूण रिक्त पदांसाठी समांतर आरक्षणाची माहिती संबंधित घटक प्रमुखांकडून मागविण्यात आली आहे.