
दैनिक चालु वार्ता मुखेड ता. प्रतिनिधी- सुरेश जमदाडे
मुखेडचे भुमिपुत्र तथा जि.प.चे सेवानिवृत्त शिक्षक रसुलसाब अत्तार यांचे सुपुत्र मुंबई येथील वीरमाता जिजाबाई तंत्रशास्त्र संस्थेतील उत्पादन अभियांत्रिकी विभागाचे प्रा. पिरसाब रसूलसाब अत्तार यांना दि. ५ नोव्हेंबर रोजी भारतीय प्रौद्योगिकी संस्थान (आय.आय.टी.) दिल्ली संस्थेकडून डॉक्टरेट ( पीएचडी ) पदवी प्रदान करण्यात आली आहे . ही पदवी अधिष्ठाता प्रा.डॉ. नारायणन डी. कुरुर यांच्या हस्ते भारतीय प्रौद्योगिकी संस्थान दिल्ली येथे ५३ व्या दीक्षांत समारोहात देण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.राजगोपाल चिदंबरम ( अध्यक्ष , नियामक मंडळ , भारतीय प्रौद्योगिकी संस्थान दिल्ली ), प्रमुख पाहुणे प्रा.डॉ.अभिजित बॅनर्जी ( नोबेल पारितोषिक विजेते, आर्थिक विज्ञान २०१९) हे होते. प्रा . डाॅ.रंगन बॅनर्जी ( संचालक , भारतीय प्रौद्योगिकी संस्थान दिल्ली), प्रा.डॉ.पी.व्ही . राव, प्रा.डॉ.सुदर्शन घोष मंचावर उपस्थित होते.
प्रा.पिरसाब अत्तार यांनी “ शाश्वत कूलिंग तंत्र वापरून निमोनिक ९० चे ग्राइंडिंग आणि ग्राइंडिंग फोर्सचे मॉडेलिंग ” या विषयावर शोधप्रबंध सादर केला आहे. त्यांना भारतीय प्रौद्योगिकी संस्थान दिल्ली येथील यंत्र अभियांत्रिकी विभागाचे प्रा.डॉ.पी.व्ही.राव आणि प्रा.डॉ.सुदर्शन घोष यांचे मार्गदर्शन लाभले. डिसेंबर २०१७ मध्ये आय.आय.टी. मद्रास येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत व तसेच ऑक्टोबर २०१९ मध्ये शिकागो, अमेरिका येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेदरम्यान प्रा.पिरसाब अत्तार यांनी त्यांचा शोधनिबंध सादर केला होता. अंततः त्यांनी ग्राइंडिंग ऑपरेशनसाठी शाश्वत पर्यावरणास अनुकूल शीतल द्रवपदार्थ प्रस्तावित केले जेणेकरून पर्यावरण प्रदूषित होण्यापासून बचाव होईल व तसेच कामगार निरोगी राहतील. त्यांच्या यायशाबद्दल त्यांचे मुखेड येथील मान्यवरांसह प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारीसह मित्रपरिवारांनी अभिनंदन केले आहे.