
दैनिक चालू वार्ता औरंगाबाद उपसंपादक- मोहन आखाडे
कन्नड : त्रैमासिक तिफण, भाषा, साहित्य, संस्कृती आणि संशोधन परिषद शाखा कन्नड यांच्यातर्फे औराळा ता. कन्नड येथे पाचवा राज्यस्तरीय कविता महोत्सव जानेवारी मध्ये संपन्न होणार आहे. या कविता महोत्सवात स्थानिक कविंच्या कवि संमलेनाध्यक्षपदी मालेगाव (नाशिक) येथील प्रसिद्ध कवी राजेंद्र दिघे यांची निवड करण्यात आली आहे. शिक्षक असलेले दिघे हे उत्तम कवी व लेखक असून वाड्मयीन चळवळीतील सक्रिय कार्यकर्तेही आहेत. त्यांचा ‘काळ्या आईची तहान’ हा कविता संग्रह व ‘शाब्बास गुरुजी’ हा लेख संग्राह प्रसिद्ध आहे. अनेक नियतकालिकातून त्यांची कविता प्रसिद्ध झालेली आहे. अखिल भारतीय साहित्य संमेलना शिवाय त्यांनी अनेक कवि संमेलनात निमंत्रित कवी म्हणून सहभाग घेतला आहे. आई प्रतिष्ठानचे ते संस्थापक अध्यक्ष असून अनेक वाडमयीन उपक्रम सातत्याने आयोजित करतात. वैजापूर तालुक्यात त्यांनी सहा ग्रामीण साहित्य संमेलने आयोजित केलेली आहे, त्यांना अनेक साहित्य पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. वाचक चळवळ गतिमान करण्यासाठी अनेक वाचनालय व शाळांना त्यांनी पुस्तके भेट दिली आहेत.
कन्नड तालुक्यातील अनेक नवकवी सातत्याने लेखन करतात. त्यांना या कविसंमेलनात सहभागी करून घेतले जाणार आहेत. स्थानिक कन्नड तालुक्यातील कवी , कवयित्रींनी आपली नावे प्रविण दाभाडे, अरुण थोरात, ज्ञानेश्वर गायके, संदीप ढाकणे , अनिता राठोड , संदीप वाकडे, लक्ष्मण वाल्डे यांच्याकडे द्यावीत असे आवाहन तिफण कविता महोत्सवाचे मुख्य संयोजक डॉ. शिवाजी हुसे यांनी केले आहे.