
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधीभूम -नवनाथ यादव
साध्या वेशात पोलिसांची टवाळखोरांवर करडी नजर
पोलीस अधिकारी साध्या वेशात शाळेच्या परिसरामध्ये विद्यार्थ्यांचे नातेवाईक वगळता इतर युवक जर निष्कारण फिरत असतील तर त्यांचे फोटो किंवा व्हिडिओ शूटिंग काढून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ड्रेसकोड व ओळखपत्र बंधनकारक करण्याबाबत प्राचार्य आणि त्या-त्या शाळेच्या मुख्याध्यापकांना सूचना देण्यात आल्या आहेत. यापुढील काळात ही मोहीम आणखी गतिमान असणार आहे.मंगेश साळवे (प्रभारी पोनि)
भूम:- भुम पोलिसांची रोडरोमिओविरूध्द धडक मोहीम हाती घेतली असून शाळा-महाविद्यालयांमध्ये प्रवेश नसतानादेखील विनाकारण शाळा-महाविद्यालयांबाहेर टवाळखोर आणि टारगट तरुणांची गर्दी पाहायला मिळते. विनाकारण वाहनांचे कर्णकर्कश हॉर्न वाजविणे, स्टंटबाजी करणे यासारखे उद्योग या टवाळखोरांकडून केले जातात. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. मुलींच्या छेडछाडीचे प्रमाण वाढते आणि यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवतो म्हणून अशा रोडरोमिओंवर वेळोवेळी कायदेशीर कठोर कारवाई करणे अत्यंत गरजेचे असल्याने सोमावरी भूम पोलीस पथकाने रोडरोमिओंना ताब्यात घेत चांगलाच प्रसाद दिला,शाळकरी मुली किंवा महाविद्यालयीन आपले शिक्षण पुढील काळात कुटुंबियांनी बंद करू नये यासाठी या रोडरोमियोंचा त्रास सहन करतात.मुली हा अत्याचार निमुटपणे सहन करत गेल्याने अशा प्रकारांमध्ये वाढ होते. यामध्ये काही मुली शिक्षण सोडून देतात तर काही मुली टोकाचे पाऊल उचलतात. यातील गांभीर्य लक्षात घेऊनच प्रभारी पोनि मंगेश साळवे यांनी ही मोहीम उघडली आहे. पोलीस खात्याच्या कर्तव्याबाबत कायम दक्ष असणारे प्रभारी पोनि साळवे यांनी पालकांच्या तक्रारीनंतर तत्काळ पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये त्यांनी पथकाची स्थापना केली. सोमवारी शाळकरी मुलींची छेड काढण्याच्या उद्देशाने आलेल्या काही युवकांना या पथकाने ताब्यात घेत त्यांना चोप दिला.तसेच त्यांच्या पालकांना बोलावून त्यांना समज देऊन सोडून देण्यात आले. भूम पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे रोडरोमिओमध्ये खळबळ उडाली आहे. शाळकरी आणि महाविद्यालयीन युवतींची जर छेड काढली जात असेल तर त्यांनी तो प्रकार कुटुंबीयांना किंवा पोलीस स्टेशनला सांगावा. त्यांचे नाव कोठेही उघड केले जाणार नाही असेही प्रभारी पोनि मंगेश साळवे यांनी संगीलते.