
दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : जिल्हा व तालुका स्तरावरील वैद्यकीय सेवेतील कार्यरत अधिकारी व कर्मचारी या सर्वांनी मुख्यालयी राहूनच रुग्णांना सेवा तत्पर पुरवावी अन्यथा कठोर कारवाई केली जाईल, असा निर्वाणीचा इशारा परभणीच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी वैद्यकीय सेवेतील सर्वांना दिला आहे.
परभणी जिल्ह्यातील ग्रामीण भागांतर्गत गावखेड्यात जेथे जेथे वैद्यकीय सेवा पुरविण्याची केंद्रे कार्यरत आहेत, त्या ठिकाणी कर्तव्यावर असलेले बहुतांश वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी वास्तव्यास नसल्याचे आढळून आले आहे. परिणामी रुग्णांची उपचाराअभावी हेळसांड होऊन संपूर्ण वैद्यकीय विभाग व पर्यायाने प्रशासनासही टीकेचे लक्ष्य बनले जावे लागते. शिवाय रुग्णांवर ओढवले जाणारे संकट हे वेगळेच असते. यांचा गांभीर्याने विचार करुन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी पालम, पूर्णा व परभणीतील रुग्णालयांना अचानक भेटी देऊन तेथील वैद्यकीय सेवेची, अधिकारी व कर्मचारी उपस्थितीची आणि स्वच्छतेविषयीची पहाणी करुन आढावा घेतला. त्यावेळी कांही ठिकाणी समाधानकारक तर कांही ठिकाणी आश्चर्यकारक अशी परिस्थिती गोयल यांना आढळून आल्याचे समजते. त्याचाच परिपाक म्हणून जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी सक्तीचे निर्देश देत कर्तव्यावरील सर्वांनीच मुख्यालयी वास्तव्य करण्याचा आणि वेळेतच सेवा पुरविण्याचा इशारा दिला. एवढ्यावरही जे कोणी आदेशाचे उल्लंघन करतील व आपल्या कर्तव्यात कसूर करतील त्यांच्यावर कठोर कारवाईचा बडगा उगारला जाईल असा निर्वाणीचा इशारा दिला. त्यामुळे जिल्हाभरातील अधिकारी व कर्मचारी वर्गात खळबळ माजली आहे.
दरम्यान जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी घेतलेला निर्णय अगदी योग्यच असल्याचे बोलले जात आहे. बऱ्याच ठिकाणी मग ते अधिकारी असो वा कर्मचारी कर्तव्याच्या ठिकाणी वास्तव्यास न थांबता शहरी भागातच राहाणे पसंत करतात नव्हे हे वास्तव आहे. त्यांना त्यांच्या परिवाराची, मुलांच्या शिक्षणाची व राहाण्याची जशी काळजी असते किंबहुना तशी काळजी रुग्णांची व त्यांच्या सेवेची घेणे अत्यंत गरजेची असूनही ती जाणिवपूर्वक दूर्लक्षित केली जाते. त्यांना कर्तव्याचा विसर पडला जातो. परिणामी हक्क व गरज असूनही वेळेतच उपचार व वैद्यकीय सुविधा उपलब्ध न झाल्याने अनेक रुग्णांना त्याची किंमत मोजावी लागते. त्यांच्या परिवारांवर नानाविध समस्या सहन करण्याची पाळी निर्माण होत असते. या व अशा कोणत्याही समस्यांचा सामना रुग्ण किंवा त्यांचे आप्तेष्ट यांना करावा लागणार नाही असेच जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या आदेशामुळे वाटणे स्वाभाविक आहे. हा आदेश तात्पुरता न राहाता कायमस्वरूपी अंमलात आणला गेला तर आणि तरच नागरिकांना दिलासा मिळू शकेल शिवाय अधिकारी व कर्मचारी यांच्यावरही भीतीचे सावट राहिले जाईल एवढे नक्की.