
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी -श्रीकांत नाथे
अमरावती :-केंद्र शासनाने प्रधानमंत्री क्षयरोग मुक्त भारत अभियान हा उपक्रम देशभर सुरु केला आहे.सन २०२५ पर्यंत देशाला क्षयरोग मुक्त करण्याचे उद्दिष्ट असून जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत या उपक्रमाबाबत जनजागृती होण्यासाठी क्षयरुग्णांना वेगवेगळ्या पध्दतीने मदत देऊन त्यांना औषधोपचार मिळून देण्यात येत आहे.क्षयरुग्णांना मदत म्हणून ‘निक्षय मित्र नोंदणी’ करण्याचे आवाहन जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.रमेश बनसोड यांनी केले आहे.
प्रधानमंत्री क्षयरोगमुक्त भारत अभियानांतर्गत देशातून क्षयरोग दुरीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवले असून ते पूर्ण करण्यासाठी नागरिक व स्वयंसेवी संस्थांचा सहभाग महत्त्वाचा आहे.समाजातील विविध घटक जसे दानशूर व्यक्ती,राजकीय व्यक्ती,स्वयंसेवी संस्था,सहकारी संस्था,इतर कार्यालय व संस्था,औद्योगिक संस्था,राजकीय संस्था अशा नोंदणी केलेल्या निक्षय मित्रांमार्फत आवश्यकतेनुसार क्षयरुग्णांच्या पोषक आहारात सहाय्य दिले जाते. यासाठी जिल्हा क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत उपचार मिळणाऱ्या क्षयरुग्णांना ‘निक्षय मित्र’ म्हणून सहभागी होण्याचे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.
‘निक्षय मित्र’ नोंदणी करण्यासाठी http://reports.nikshay.in/FormIO/Donar Registration या संकेतस्थळावर नाव नोंदणी करावी.नाव नोंदणीनंतर स्थानिक जिल्हा क्षयरोग अधिकारी यांना संपर्क करण्यासाठी तपशील उपलब्ध होतो.त्यानंतर त्यांच्या कार्यक्षेत्रातील उपचार घेणाऱ्या क्षय रुग्णांची व मदत घेण्यास इच्छुक असणाऱ्या क्षयरुग्णांची यादी उपलब्ध होते.एक निक्षय मित्र एक किंवा अनेक क्षय रुग्णांना दत्तक घेऊ शकतात व कमीत-कमी सहा महिने व जास्तीत जास्त ३ वर्ष मदत करु शकतात.क्षयरुग्णांना पोषक आहार देण्यासाठी प्रती महिना,प्रती रुग्ण सुमारे ३०० रुपये ते ५०० रुपये इतका खर्च येतो.
अधिक माहितीसाठी हेल्पलाईन नंबर १८००-११-६६६६ तसेच डॉ.रमेश बनसोड यांचा भ्रमणध्वनी क्रमांक ९८८११०२३०३ यावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा क्षयरोग अधिकारी यांनी केले आहे.