
दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : आगामी विधानसभा निवडणुकीत पाथरीची जागा आपल्याकडे खेचून घेण्याची तयारी राष्ट्रवादीकडून जोमाने चालविली जात आहे. कॉंग्रेसला धक्का देत अनावधानाने गेलेली ती जागा आमचीच असल्याचा कणखर दावा करीत बाबाजानी दुर्रानीं कडून नकळतच कॉंग्रेसला इशारा दिला असल्याने जिल्ह्यात सर्वत्र खळबळ माजली जाणे स्वाभाविक आहे.
परभणीचे माजी आमदार तथा राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष विजय गव्हाणे, प्रा. किरण सोनटक्के यांच्या उपस्थितीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत परभणी जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष दुर्रानी यांनी ही माहिती दिली त्यावेळी कार्यकर्त्यांची भारी संख्येत मौजुदगी होती.
दुर्रानी हे मागील निवडणुकीत पराभूत झाले होते. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी आणि पक्षीय समतोल राखता यावा यासाठी त्यानंतर त्यांना पक्षातर्फे परिषदेवर घेऊन त्यांचे प्राबल्यही मजबूत केले गेले. दरम्यान मधल्या काळात दुर्रानी यांना सभापती तालिकेवर घेऊन पक्ष नेतृत्वाने पुन्हा त्यांचे राजकीय वजन वाढविले. कॉंग्रेस हा मविआ मधील घटक पक्ष आहे. मागील निवडणुकीत ही जागा कॉंग्रेसने पटकावून विजय संपादन केला आहे. असं असतानाही दुर्रानी यांनी कॉंग्रेसला अडगळीत टाकून पुन्हा त्या जागेवर आपलाच दावा असल्याचा शड्डू ठोकला आहे. त्यामुळे कॉंग्रेस पूरती घायाळ होऊन नाराजीचा सूर उमटला जाणे स्वाभाविक आहे. परिणामी मविआ मध्ये फूटीला निमंत्रण दिले जाईल की काय, अशीच भीती व्यक्त केली गेल्यास मुळीच आश्चर्य वाटू नये.
बाबाजानी दुर्रानी यांनी पुढे असेही म्हटले आहे की, पाथरी तालुक्यात आमचेच प्राबल्य आहे. एवढेच नाही तर परभणी जिल्ह्यावरच आमचे अधिक बळ असल्यामुळे पाथरीची जागा ही आमची आणि आमचीच राहिली जाणार आहे यात तसूभरही शंका नाही, असा कणखर दावा करुन याबाबत लवकरच आम्ही नेतृत्वालाही साकडे घालून त्यात नक्कीच यश मिळविले जाईल असा विश्वास ही दुर्राणी यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या या मतांशी सहमत असल्याची सहमती उपस्थित विजय गव्हाणे आणि प्रा. किरण सोनटक्के यांनी बोलल्याचे समजते.
दरम्यान दुर्रानी यांच्या या प्रखर दाव्यामुळे कॉंग्रेस नेमकी काय भूमिका घेणार, हे पुढील काळात दिसून येणारच आहे. तथापि विद्यमान आमदार कॉंग्रेसचाच असल्याने सहजा सहजी ती जागा राष्ट्रवादीला न देता आघाडीतून बाहेर पडलेलेच बरे राहिल अशी भूमिका ही त्या पक्षाकडून घेतली जाईल अशी शक्यता वर्तवली गेल्यास आश्चर्य वाटू नये.