
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथील राधाबाई सारडा महाविद्यालय परिसरात अनेक वर्षांपासून असलेला नौगज्जी बाबा दर्गा शनिवारी रात्री उशिरा कडक पोलीस बंदोबस्तात हटविण्यात आला.मात्र २० ते २५ मुखवटा घातलेले लोक तेथे आले व पोलीस पथक येताच दगडफेक करून वेगवेगळ्या दिशेने पळ काढला.त्यामुळे येथील कॅम्पसमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.त्यामुळे पोलीसांनी सारडा महाविद्यालय परिसरात चोख बंदोबस्त तैनात केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,अंजनगाव सुर्जी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राधाबाई सारडा महाविद्यालयाची इमारत परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून एक दर्गा आहे.मात्र या कॉलेज कॅम्पसमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून नौगज्जी बाबा नावाचा दर्गा होता.तो काढण्यासाठी कॉलेज प्रशासनाने न्यायालयाची परवानगी घेऊन पोलीसांचा बंदोबस्त घेतल्यानंतर शनिवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास दर्गा हटविण्याचे काम सुरू होते.यावेळी महाविद्यालयातील अधिकारी,कर्मचारी यांच्यासह तीन अधिकारी व १५ पोलीस कर्मचारी हे त्या कारवाई दरम्यान उपस्थित होते.दरम्यान तेथे नंतर अंधारात २० ते २५ अज्ञात लोक मुखवटा घालून जमा होत दर्ग्याजवळ पोहोचले आणि त्यांनी कारवाई चालू असतांना सुरक्षेत लागलेल्या पोलीसांवर दगडफेक सुरू केली.त्यामुळे प्रकरण चिघळले.काही वेळाने सर्व लोक वेगवेगळ्या दिशेने पळून गेले.या घटनेमुळे कॅम्पसमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण होताच अंजनगाव सुर्जी परिसरात पोलीसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.दुसरीकडे,रुपल नागतोडे यांनी कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणल्याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून अंजनगाव सुर्जी पोलीसांनी २० ते २५ अज्ञात आरोपींविरुद्ध भादंवि कलम १४३,१३६ अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.कॉलेज कॅम्पसमध्ये १८ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बंदोबस्तात दर्गा हटविण्याचे काम सुरू होते.मात्र अचानक काही लोकांनी दगडफेक सुरू केली.संबंधित आरोपींविरुद्ध पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.