
दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
“”””””””””””””””””“””””””””””””””””””””””””
परभणी : जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांची येथून उचलबांगडी केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा ठाम निर्धार भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहूल लोणीकर यांनी परभणीतील एका जाहीर कार्यक्रमात व्यक्त केला.
राहूल लोणीकर यांचा परभणी भाजपातर्फे जाहीर सत्कार आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मंचावरुन विविध पदाधिकाऱ्यांकडून जिल्हा पोलिसांच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला गेला. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार असे समजते की, प्रदेशाध्यक्ष राहूल लोणीकर यांच्या आगमनसमयी भाजपातर्फे काढण्यात आलेल्या रॅलीवर पोलिसांनी करडी नजर ठेवल्याचा आरोप केला गेलाय. त्याशिवाय सदर रॅलीला पोलिसांनी प्रखर विरोधही केल्याचे विविध पदाधिकाऱ्यांच्या संतप्त वक्तव्यातून निष्पन्न होतांना आढळून आले. त्याचाच परिपाक म्हणून राहूल लोणीकर यांच्याही मनाला वेदना होणे स्वाभाविक आहे. भाजपाच्या रॅलीला पोलिसांचा विरोध म्हणजे प्रदेश पातळीवर सत्ताधारी भाजपाची धुरा सांभाळणाऱ्या राहूल लोणीकर यांच्या स्वाभिमानाला कुठे तरी ठेच पोहोचली असावी आणि कार्यकर्ते व पदाधिकारी यांचाही इगो दुखावला गेला असावा असेच यातून दिसून आल्यास वावगे ठरु नये.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच राज्याच्या गृहमंत्री पदी आहेत शिवाय ते भाजपाचे नेते आहेत. राज्याचे माजी मंत्री म्हणून ज्यांनी मागील सरकार मध्ये कार्यभार सांभाळला होता ते, बबनराव लोणीकर हे राहूल लोणीकर यांचे पिताश्री आहेत. एवढं सारं काही प्रस्थ पक्षात व सरकार मध्ये असूनही जर परभणी पोलिसांकडून अशा प्रकारची दुय्यम वागणूक मिळत असेल तर नक्कीच कुठे तरी परभणीच्या भाजपा कार्यकर्त्यांना व पदाधिकारी यांची स्थानिक राजकारणातली इमेज ती काय राहिली जाईल असेही वाटले जाणे स्वाभाविक आहे. किंबहुना त्यासाठीच सर्वांनी टाहो फोडून पोलिसांप्रति विरोधात असलेल्या आपल्या व्यथा राहूल लोणीकर यांच्या समोर विषद केल्या गेल्या. कार्यकर्त्यांची व्यथा ध्यानी घेऊन आणि दस्तूरखुद्द राहूल लोणीकर यांच्याच स्वागतासाठी काढली जाणारी भव्य अशी रॅली पोलिसांच्या कोणत्या वृत्तीमुळे काढणे अशक्यप्राय झाले, हे सुध्दा कुठे तरी खटकण्यासारखेच वाटले असावे आणि म्हणूनच लोणीकर यांनी निर्धाराची भाषा वापरुन एका बाजूला कार्यकर्ते खुश करणे आवश्यक होते तर दुसऱ्या बाजूला पोलिसांवरही दबाव निर्माण करुन राजकारणात ले वजन वाढविले जाणे महत्त्वाचे ठरले जाणे गरजेचे होते.
दरम्यान राहूल लोणीकर यांनी परभणी पोलिसांच्या विरोधात घेतलेली कडवी भूमिका नेतृत्वाला जर मनाजोगी वाटली तरच पुढील सर्व घडामोडी घडून येतील हे सुध्दा तितकेच खरे आहे.
यापूर्वी सुध्दा गंगाखेडचे राष्ट्राचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी सुध्दा यापूर्वी कार्यरत पोलीस व अधिकारी यांच्या विरोधात कठोर भूमिका घेतली होती. एवढेच नाही तर थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही तक्रार करुन करुन बदली संबंधीचे प्रयत्न चालविले होते. कांहीं दिवसांनंतर संबंधित अधिकाऱ्यांची झालेली बदली ही आमदार डॉ. गुट्टे यांच्यामुळेच असे संबोधले गेले. काल राहूल लोणीकर यांनी आपलं
या भाषणातून व्यक्त केलेला राग आणि आज युवा मोर्चातील काही पदाधिकाऱ्यांनी गहखात्याकडे केलेल्या तक्रार अर्जात परभणी शहर व परिसरात खुलेआम सुरू असलेले अवैध धंदे ज्यामध्ये दारुचे गुत्ते, मटका आणि अंमली पदार्थांची राजरोसपणे होणारी विक्री आदींचा समावेश करुन त्यामुळे तरुणाई बिघडत जातं असल्याचाही ठपका ठेवला आहे. एकूणच या ना त्या कारणांमुळे परभणीचे पोलीस पूरते अडचणीत आणून या सर्व प्रकरणांना परभणी पोलीसच कसे जबाबदार असल्याचे भाजपाने हे प्रयत्न चालविले आहेत एवढे नक्की. सत्ताधारी भाजपानेच घेतलेली ताठर भूमिका त्यांना फलदायी ठरली जाणे का पोलिसांना समज देवून बदली न करता जैसे थे असेच ठेवले जाते, हे येणारा काळच दाखवून देईल असे म्हणून चुकीचं ठरणार नाही. अन्यथा उठसुठ तक्रारी अन् रागाने होणाऱ्या बदल्या वास्तवात आले तर अधिकाऱ्यांनाही काम करणे अडचणीचे ठरु शकेल याचीही साशंकता व्यक्त होऊ शकते. तद्वतच राहूल लोणीकर यांच्या वक्तव्याचे दबावतंत किती प्रमाणात जादू करु शकेल हे दिसून येईलच.