
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी -श्रीकांत नाथे
अमरावती : अंजनगाव सुर्जी तालुक्यातील सरकारी जागेवरील अतिक्रमण काढण्यासाठी दिनांक ६ डिसेंबर रोजी अंजनगाव सुर्जी पंचायत समिती समोर निमखेड बाजार येथील नागरिक यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली होती.त्या उपोषणाची सांगता आज शुक्रवार दिनांक ९ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता करण्यात आली
निमखेड बाजार येथे सरकारी जागेवर गावातील लोकांनी अतिक्रमण केले होते.त्या अनुषंगाने स्थानिक ग्रामपंचायत येथे वेळोवेळी सदर अतिक्रमण काढण्याकरिता तक्रारी निवेदने देण्यात आली होती.परंतु ग्रामपंचायत सचिव,पंचायत समिती अधिकारी यांनी कोणतीही कारवाई केली नाही सचिव यांनी अतिक्रमण बाबत खोटे ठराव घेवून गावातील समस्यांबाबत चौकशी न करता लोकांची दिशाभूल केली.याबाबत तक्रारी केल्या पण कोणतीही दखल घेतली नाही त्यामुळे उपोषणकर्त्यांनी आयुक्त अमरावती जिल्हाधिकारी यांच्याकडे दाद मागितली असता त्यांनी पंचायत समिती कार्यालय यांना चौकशीचे आदेश पारित केले.परंतु पंचायत समितीकडून त्या आदेशाला केराची टोपली दाखवली म्हणून विनोद रामकृष्ण शेळके,नरेश श्रावण शिंगाडे,गजानन भास्कर कबाडे,ओमप्रकाश कबाडे व नंदकिशोर विश्वासराव शेळके यांनी उपोषणाचा मार्ग निवडला. दिनांक ६ डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून उपोषणाची सुरुवात केली.आज गटविकास अधिकारी यांच्या लेखी आश्वासनाने उपोषणकर्त्यांना शरबत पाजुन उपोषणाची सांगता करण्यात आली.याप्रसंगी तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार काळे,गटविकास अधिकारी विनोद खेडकर,विस्तार अधिकारी सुनील गवई,आनंद दादा संघई,संतोष गोलाईत,किशोर पवार,महेंद्र शिंदेजामेकर तसेच नझुल कर्मचारी पंचायत समिती कर्मचारी ग्रामसेवक उपस्थित होते.