
दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : जिल्ह्यातील विचारवंत व सामान्य नागरिकांशी समन्वय राखत इंत्थंभूत समस्यांची जाण करुन घेतली जाईल व जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचा सर्वंकष विचार करुन आधुनिक पद्धतीचा आराखडा लवकरच तयार केला जाईल असे धोरणात्मक प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
आज बावनकुळे हे संघटनात्मक बांधणीसाठी व राज्य व केंद्र सरकारच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या नवनवीन योजनांची अंमलबजावणी अधिक प्रमाणात कशी राबविता येईल हे सांगण्यासाठी परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यांनी माध्यमांशी बोलताना पुढे असेही सांगितले की, राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार उल्लेखनीय कार्य करीत आहे. त्यांनी सत्तेची बागडोर हाती घेतल्यानंतर अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. अनेक लोकहिताच्या योजना कार्यान्वित करुन जनतेला मोठा दिलासा देण्याचे महत्प्रयासी काम सुरु ठेवले आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी असतांना शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवून लोकाभिमुख असे निर्णय घेतले होते. किंबहुना तसेच निर्णय शिंदे व फडणवीस सरकार अंमलात आणीत आहे. मागील चार महिन्यांत या सरकारने शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, तरुण, सरकारी कर्मचारी व महिलांच्या हिताचे व प्रगतीचे भरपूर निर्णय घेतले आहेत. असं असतांना त्याचं कौतुक करण्यापेक्षा फक्त आणि फक्त टीका करीत आहेत. माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना टोमणे मारण्याशिवाय अन्य दुसरे काहीच उरले नसल्याचा उपरोधिक टोला बावनकुळे यांनी ठाकरे यांना लगावला.
ते पुढे असेही म्हणाले की,. मागील अडीच वर्षे राज्याचा विकास खुंटला होता. आता आपले सरकार आले असून राज्यात जिल्हे व तालुका पातळीवरील ज्या ज्या समस्या आहेत, मागण्या प्रलंबित आहेत, त्याचा प्रामुख्याने विचार केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विविध योजनांविषयी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. संघटनात्मक बांधणी करतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेलाही सोबत घेऊन कार्यकर्त्यांनाही बळकटी दिली जाणार आहे. एवढेंच नाही तर आगामी लोकसभेच्या निवडणुकीत राज्यात ४५ तर विधानसभेत २०० जागा निश्चितपणे जिंकल्या जातील असा आत्मविश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. केंद्र व राज्यात चालू असलेल्या जनयोजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम मी माझ्या दौऱ्यातून तर करणार आहेच शिवाय भाजपा कार्यकर्त्यांनी सुध्दा करणे गरजेचे असल्याचं ते म्हणाले. कोणीही या योजनांपासून वंचित राहिला जाऊ नये यांचाही शोध घेतला जाईल. जनमानसात या योजना पोहोचल्या पाहिजेत यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही ते म्हणाले. त्यासंबंधीचे सर्व्हेक्षण चालू असल्याचं सांगून भाजपा कार्यकर्ते या योजनांची माहिती संघटना वाढीबरोबरच करणार आहेत.
या प्रसंगी आमदार मेघना बोर्डीकर, महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाष कदम, माजी आमदार मोहन फंड, युवक प्रदेशाध्यक्ष राहूल लोणीकर, समीर दुधगावकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. दुपारच्या आंदोलनात्मक परिस्थितीवर बावनकुळे यांनी आयोजित पत्रकार परिषदेने वेगळीच कलाटणी दिली.