
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर; देगलूर तालुक्यातील करडखेल गावात पूर्वीच्याच जुन्या नळ योजनेला थुकापॉलीश करून सदरील काम मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेतून अद्यावत झाले, असे भासवून गुत्तेदार व अधिकाऱ्यांनी पूर्ण रक्कम उचलून शासनाला लाखो रूपयांचा चुना लावला आहे. याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी करडखेड गावच्या लोकप्रतिनिधींनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे.
करडखेड गावामध्ये सन २०१७ मध्ये मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेसाठी शासन स्तरावरून ७६ लक्ष रूपये मंजूर झाले. शासनाच्या नियमाच्या अधिनस्त राहून गुत्तेदारांनी दोन वर्षात काम पूर्ण करणे अपेक्षित होते; मात्र गुत्तेदार बालाजी नाईक व अधिकाऱ्यांनी संगणमत करून पाच वर्षापासून हे काम ताडकळीस ठेवत थातुरमातूर नव्हे तर सुमार दर्जाचे तलावातील स्रोताचे विहिरीपासून मुख्य जलवाहिनी पाईपलाईनचे काम अर्धवट ठेवून, पाणी पुरवठा टाकीला जलवाहिनीचे कनेक्शन न जोडता, पंपिंग ग्रहाला विद्युत कनेक्शन न जोडता, सबमर्सिबल मोटार बसून पाण्याची टेस्ट न घेता अशी अनेक प्रकारचे कामे अर्धवट अवस्थेत सोडून, कामे झालेच नसतांना कागदोपत्री कामे पूर्ण झाली, असे दर्शवून बोगस कामांची एम.बी. रेकॉर्ड करून अक्षांश-रेखांश आधारित बनावट जिओ
टॅगिंग करून त्याचे छायाचित्र वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवून मार्च २०२२ च्या पूर्वीच पूर्ण रक्कम हडप केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
याशिवाय उपांग तीनमधील पाणी वितरण पाईपलाईन गावात करणे, घरगुती नळ कनेक्शन देऊन त्याद्वारे पाणी पुरवठा करणे, फोडण्यात आलेल्या सी सी रस्त्याचे दुरूस्तीकरण करणे असेही अंदाजपत्रकात नमूद असतांना देखील गुत्तेदार बालाजी नाईक यांनी कोणतेच कामे न करता शासनाच्या नियमाची ‘ऐसी की तैशी’ करीत पूर्ण रक्कम हडप केली आहे.