
दैनिक चालू वार्ता नरखेड प्रतिनीधी -अतुल दंढारे
(नरखेड)
नरखेड: तालुक्यात होत असलेल्या ग्रामपंचायती निवडणुकी मध्ये मोठ्या व राजकीय दृष्ट्या महत्वाच्या बेलोना ग्रामपंचायत निवडणुकीत तिरंगी लढत होत असल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये दोन गट पडल्याने खरी राष्ट्रवादी काँग्रेस कोणती या संभ्रमात मतदार आहे. शिवसेना शिंदे गट व मनसे एकत्र येऊन सरपंच व सदस्यांच्या आठ जागांवर लढत आहे. मतदार कौल कोणाला देतील हे निकालानंतर स्पष्ट होईल. सध्यातरी प्रत्येक पॅनल, पक्ष व अपक्ष उमेदवार जोमाने प्रचार करीत मतदारांना मताचा जोगवा मागत असून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
तेरा सदस्यीय बेलोना ग्रामपंचायत सरपंच पद सर्वसाधारण स्त्री करिता राखीव आहे . सरपंच पदाकरिता पाच उमेदवार रिंगणात आहेत. प्रभाग क्रमांक १ मध्ये दोन जागांकरिता ८ उमेदवार , प्रभाग क्रमांक २ मध्ये दोन जागांकरिता ६ उमेदवार , प्रभाग क्रमांक ३ मध्ये तीन जागांकरिता १२ उमेदवार , प्रभाग क्रमांक ४ मध्ये तीन जागांकरिता १० उमेदवार व प्रभाग क्रमांक ५ मध्ये तीन जागांकरिता १२ उमेदवार असे पाच प्रभागातून तेरा सदस्य पदाकरिता ४८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. २हजार ३७७ पुरुष व १ हजार ९८० स्त्री असे एकूण ४हजार ३५७ मतदार उमेदवारांच्या भाग्याचा निर्णय लावणार आहे.
सरपंच पदाकरिता राष्ट्रवादी काँग्रेस आरघोडे गटाचे किसान विकास आघाडी च्या उमेदवार रेखा मंगेश पराते, राष्ट्रवादी काँग्रेस अरसडे गटाचे जय बजरंग ग्राम विकास पॅनल च्या उमा सुंदरसिंग गहेरवार, भाजप ग्राम दक्षता समिती च्या वैशाली विलास सातपुते,, बाळासाहेबांची शिवसेना व मनसे चे जनजागृती विकास पॅनल च्या सविता नामदेव सातपुते ( अदासे) व अपक्ष प्रेमलता हरनाम गौर रिंगणात आहेत.
पाच वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस ने नरेश अरसडे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक प्रमोद राठोड यांच्या पॅनेलने थोड्या फरकाने भाजप च्या माजी जिल्हा परिषद शिक्षण सभापती उकेश चौहान यांच्या गटाचा पराभव केला होता. नरेश अरसडे हे राष्ट्रवादी काँग्रेस पासून दुरावल्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सुरेश आरघोडे व माजी सरपंच दयालसिंग राठोड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस चे दुसरे पॅनल मैदानात उतरविले. विशेष म्हणजे भाजपच्या संभावित उमेदवार रेखा मंगेश पराते यांनाच मैदानात उतरविले. बाळासाहेबांची शिवसेनेचे ललित काळमेंघ व मनसेचे विनोद नाखले यांनी एकत्र येऊन सरपंच व ८ सदस्यकरिता उमेदवार मैदानात उतरविले आहे. एक अपक्ष उमेदवार ही सरपंचपदाकरिता मैदानात आहे. बेलोना येथे ठाकूर व माळी समाजाचे मोठ्या प्रमाणात मतदान आहे. त्यापाठोपाठ इतर समाजाचे ही मते निर्णनायक ठरणार आहे. मतदानापर्यंत जातींचे समीकरण कसे निर्माण होते यावर उमेद्वारासह सर्व गटांचे राजकीय भवितव्य अबलंबून आहे.
फोटो ओळ: ग्रामपंचायत कार्यालय बेलोना