
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलूर:बिलोली तालुक्यातील मौजे शिंपाळा येथे गत तीन दिवसांपासून गावातील शंभर ते सव्वाशे गावकऱ्यांना संडास व उलट्यांचा ञास होत अल्याने या गावकऱ्यांवर बिलोली येथील उपजिल्हा रूग्णालय,सगरोळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. सध्या तेथील परिस्थिती नियंत्रणात आली असून आरोग्य विभाग गावातच तळ ठोकले असून पाण्यासह अन्य काहींचे नमुने तपासणीसाठी पाठविल्याची माहिती डाॕ.वैभव रामपुरे यांनी दिली. सदरची घटना अन्नातुन झालेल्या विषबाधामुळे घडली असावी असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
बिलोली तालुक्यातील सगरोळी या गावापासून अगदी दोन अडीच किलोमीटर अंतरावर असलेल्या शिंपाळा या गावात सोमवार दि.१२ रोजी भंडाऱ्याचा कार्यक्रम झाला होता. या नंतर दि.१४ डिसेंबर रोजी अचानक गावातील ४६ गावकऱ्यांना पोटात दुखणे,मळमळ होणे,चक्कर येणे,उलटी व संडास इत्यादीचा ञास होत असल्याने त्या गावकऱ्यांवर बिलोली येथील उपजिल्हा रूग्णालय व सगरोळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती करण्यात आले होते. यानंतर दि.१५ व १६ डिसेंबर रोजी सलग दोन दिवसात तब्बल ८१ गावकऱ्यांना तसाच ञास जाणवत असल्याने त्यांच्यावर नांदेड आरोग्य विभागाच्या पथकाने शिंपाळा येथे तर काही रूग्णांवर सगरोळी व बिलोली येथील रूग्णालयात उपचार करण्यात आले. तर दोन रूग्णांना उपचारार्थ नांदेड येथील शासकिय रूग्णालयात हलविण्यात आले. सगल तीन दिवसात गावातील तब्बल १२७ लहान मुले,मोठे व वयोवृद्ध गावकऱ्यांना असाच ञास होत असल्याने नांदेड आरोग्य विभागाचे सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी शिवशक्ती पवार,प्रशासकीय अधिकारी डाॕ.अनिल रूईकर यांच्यासह अन्न व औषध विभागाच्या अधिकाऱ्यांनी शिंपाळा या गावास भेट देऊन रूग्णांच्या तपासणीसह या प्रकरणाचा तपास करण्यासाठी गावातील विविध भागातल्या पाण्यासह इतर पदार्थांचे नमुने तपासणीसाठी प्रयोग शाळेत पाठविल्याचे सांगण्यात आले. शिपाळा या गावात घडलेल्या प्रकारामुळे सतर्क झालेल्या आरोग्य विभागाने गत तीन दिवसांपासून डाॕ.व्ही.डी रामपुरे, वैद्यकीय अधिकारी अरुंधती श्रीरामवार,डाॕ.व्ही.एम माहुरे,डाॕ.विष्णू होळंबे,आरोग्य सहाय्यक तुम्मोड,कोशल्य,गायकवाड रवी,भाले व कोडामंगल सिस्टर,वाहन चालक विष्णू हे गावात तळ ठोकून आहेत.