
दैनिक चालू वार्ता जव्हार प्रतिनिधी-दिपक काकरा.
जव्हार:- तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाणारी ग्रामपंचायत कासटवाडी ह्या पंचायतीच्या कार्यक्षेत्रामध्ये जवळपास नऊ महसूल गावे आणि तब्बल अकरा पाड्यांचा समावेश असून या ग्रामपंचायतीची लोकसंख्या ही ५६३५ च्या आसपास आहे.भौगोलिक दृष्ट्या आणि लोकसंख्येचा विचार करता ही ग्रामपंचायत जव्हार तालुक्यातील सगळ्यात मोठी ग्रामपंचायत असून या ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच कल्पेश राऊत यांनी आपल्या ग्रामपंचायतीमध्ये गाव-पाड्यांचा विचार करता प्राथमिक गरजांवर लक्ष केंद्रित करत विकास कामांचा झंझावत चालू केला आहे.
संपूर्ण कासटवाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये गाव व पाड्यामध्ये विविध विकास निधीच्या माध्यमातून प्राथमिक गरजा असलेल्या कामांना प्राधान्य देऊन कल्पेश राऊत यांनी ही सुरुवात केली आहे.या विकास कामांमध्ये हाडे(घरटपाडा) येथे गटार व संरक्षण भिंत बांधणे,हाडे(धूमपाडा)-चोंढीचापाडा येथे दोन पाड्यांना जोडणाऱ्या पुलाला लोखंडी ऱ्यालिंग बसविणे,कासटवाडी येथे प्रवाशांकरीता नवीन बस थांबा व कंपोस्ट पीट बांधणे अशा कामांचे उद्घाटन करून सुरुवातही करण्यात आली आहे.यावेळी ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुलोचना चौधरी,सदस्य त्र्यंबक रावते,बाळू भोये,कुणाल सापटा,नितीन टोकरे,राजश्री टोकरे तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते.