
दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी -दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी/धानोरा : शासकीय भूखंडांचा श्रीखंड ओरपण्याचा गोरखधंदा करणाऱ्या तीन ग्रामपंचायत सदस्यांची जिल्हाधिकाऱ्यांनी हकालपट्टी करत थेट घरचा रस्ता दाखवला. दरम्यान केवळ हकालपट्टी न करता आपल्या अधिकाराचा गैरवापर करून शासन मालकीच्या भूखंडांवर डल्ला मारलेल्या त्या सर्व मालमत्ता जप्त करुन त्या सर्वांवर कठोर कारवाईचा बडगा उगारला जाणे आवश्यक असल्याची मागणी ग्रामस्थांनी केल्याचे समजते आहे.
लोहा शहरापासून काही अंतरावरील धानोरा मक्ता येथील सोमाबाई रमेश कदम (उपसरपंच), एकनाथ बोलणारे, बालाजी यादू मातोरे या तीन विद्यमान ग्रा.पं. सदस्यांनी रस्ता क्रमांक २८ वरील ०९, ५६४, ५७८, ६६५ क्रमांकाच्या या मालमत्तांवर अतिक्रमण केल्याची तक्रार दस्तूरखुद्द अंकुश राठोड, कांताबाई गायकर या विद्यमान सदस्यांनीच केल्यामुळे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी तात्काळ दखल घेत गटविकास अधिकारी व बांधकाम शाखा अभियंता असे द्विसदसीय चौकशी पथक नेमले.
सदर पथकाद्वारे ग्रामपंचायत समक्ष चौकशी दरम्यान प्राप्त माहितीनुसार लिप्त सदस्यांनी अतिक्रमणं सिध्द झाल्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्द करण्यात आला. त्यानंतर वादी आणि प्रतिवादींचे म्हणणे समोरासमोर ऐकून घेत जिल्हाधिकारी राऊत यांना आरोपात तथ्य आढळून येतात सदर लिप्त तिन्ही सदस्यांचे सदस्यत्व उर्वरित काळासाठी रद्द करुन त्यांना निलंबित करण्यात आल्याचे आदेश दिले गेले. गाव आणि ग्रामस्थांची इमाने इतबारे सेवा करु असे निवडणूकी पूर्वी अभिवचन देणारे हे तिन्ही सदस्य जनसेवा करण्याऐवजी स्वतःच मेवा लाटून खात असल्याचे ध्यानी घेऊन जिल्हाधिकारी यांनी कठोर शिक्षेचा अंमल करणे अपेक्षित होते. तद्वतच जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी भूखंडाचे श्रीखंड ओरपणाऱ्या या तिन्ही ग्रामपंचायत सदस्यांची एकप्रकारे हकालपट्टीच केली आहे असं म्हटलं तर वावगं ठरु नये.
दरम्यान या आदेशाचे स्वागत करुन त्यांना केवळ निलंबित न करता सदरच्या मालमत्ता जप्त करुन संबंधितांवर कठोर कारवाईचा बडगा उचलला जावा अशी मागणी ग्रामस्थांनी केल्याचे समजते. जेणेकरून भविष्यात शासनाचे असे कोणतेही भूखंड लाटून त्यांचे श्रीखंड ओरपण्याचे धाडस कोणी करु शकणार नाही असे वाटणे स्वाभाविक आहे. एकूणच या प्रकरणामुळे सर्वत्र खळबळ माजली असली तरी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आरोपितांच्या पूरत्या मुसक्या आवळल्या चे बोलले जात आहे.