
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- जिल्ह्यातील चिखलदरा हे पर्यटन स्थळ असून दि.३१ डिसेंबर रोजी अमरावती जिल्ह्यातील व आजूबाजूच्या जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर पर्यटक चिखलदरा येथे नववर्ष उत्सव साजरा करण्यासाठी येतात.या पार्श्वभूमीवर दि.३१ डिसेंबर २०२२ ते १ जानेवारी २०२३ दरम्यान परतवाडा ते चिखलदरा मार्ग हा अरुंद व घाटवळणाचा असल्याने तेथे वाहनांची गर्दी होऊन वाहतूक खोळंबण्याची व अपघात होण्याची शक्यता असते.मोटार वाहन कायदा १९८८ चे कलम ११५ अन्वये या कालावधीत वाहतूकीचे नियमन योग्य प्रकारे करता यावे, यासाठी दि.३१ डिसेंबर २०२२ ला सकाळी ०८:०० वाजेपासून दि.१ जानेवारी २०२३ ला सायंकाळी ०६:०० वाजेपर्यंत परतवाडा ते धामणगाव मार्गे चिखलदरा हा रस्ता जाण्यासाठी तसेच चिखलदरा,घटांग मार्गे परतवाडा हा रस्त येण्यासाठी या मार्गाची वाहतूक एकमार्गी करण्यात येत आहे.या अधिसूचनेचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द मोटार वाहन कायदा १९८८ व मुंबई पोलीस कायदा १९५१ नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल,असे निर्देश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी दिले आहेत.