
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :-जगातील कोरोना उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर राज्यातही खबरदारी घेण्यात येत आहे.नागरिकांनी घाबरुन जाऊ नये.जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सज्ज आहे.नागरिकांनी कोविड अनुरुप वर्तन,पंचसुत्रीचे काटेकोर पालन करावे.सार्वजनिक ठिकाणी दक्षता म्हणून मास्क वापरण्याचे आवाहन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी आज येथे केले.जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे कोविड संसर्गजन्य आजाराच्या वाढत्या प्रादुर्भावाविरुध्द करण्यात येणाऱ्या उपाययोजना,जिल्ह्यातील कोविड परिस्थिती व आरोग्य यंत्रणेच्या सुविधेबाबत जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली,त्यावेळी त्या बोलत होत्या.निवासी उपजिल्हाधिकारी विवेक घोडके,मनपा आयुक्त डॉ.प्रवीण आष्टीकर,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी एस.डी.जोशी,जिल्हा शल्य चिकित्सक दिलीप सौंदळे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले, डॉ.पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.ए.टी.देशमुख,पोलीस निरीक्षक (अमरावती शहर) गजानन गुल्हाने तसेच संबंधित विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.राज्यातील कोविड परिस्थिती पूर्ण नियंत्रणात असली तरी आंतरराष्ट्रीय पातळीवर मात्र चीन,जपान,अमेरिका,ब्राझिल या देशांमध्ये रुग्ण वाढतांना दिसत आहेत.चीनमध्ये कोविड विषाणूंचा बीएफ.७ हा प्रकार अधिक वेगाने वाढत आहे.नव्या विषाणूचा शिरकाव भारतात होऊन कोरोना विषाणू लाटेचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून नागरिकांनी मास्कचा वापर करीत गर्दीत जातांना सुरक्षित अंतर ठेवावे.कोविड सदृश्य लक्षणे आढळताच त्वरित नजीकच्या आरोग्य केंद्राची मदत घ्यावी,असे श्रीमती कौर यावेळी म्हणाल्या.कोरोनाच्या नव्या प्रकाराच्या पार्श्वभूमीवर चाचण्या,ट्रॅकिंग,उपचार,लसीकरण यावर भर देण्यात येईल.आवश्यकतेनुसार जिल्ह्यात चाचण्यांची संख्या वाढविण्यात येईल.जिल्ह्यातील १३ टक्के नागरिकांनी अजूनही पहिली मात्रा घेतली नाही.सध्या जिल्ह्यात कोवॅक्सिन लस उपलब्ध आहे. ज्यांचे अद्याप लसीकरण झाले नाही त्यांनी त्वरित लसीकरण करुन घ्यावे.ज्यांनी दुसरी मात्रा तसेच बुस्टर मात्रा घेतली नाही त्यांनीही त्वरित लसीकरण करुन घ्यावे.नागरिकांनी घाबरुन जाऊ नये,अफवांवर विश्वास ठेवू नये,लसीकरण पूर्णपणे सुरक्षित आहे.दक्षता म्हणून नागरिकांनी खबरदारी बाळगण्याचे निर्देश श्रीमती कौर यांनी यावेळी दिले.