
दैनिक चालू वार्ता जव्हार प्रतिनिधी-दिपक काकरा.
जव्हार:- जव्हार तालुक्यातील श्री गगनगिरी आदिवासी शिक्षण प्रसारक संस्था संचलित एकलव्य प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा हिरडपाडा ही आश्रम शाळा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जव्हार अंतर्गत सुरू आहे.या आश्रमशाळेचे शैक्षणिक क्षेत्रातील कामकाज उल्लेखनीय व दर्जेदार असल्याने सिटू प्रणित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य,जव्हार प्रकल्प कार्यकारिणीच्या वतीने ०३ जानेवारी २०२३ रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मयुरेश्वर महादेव मंदिर, मोरचोंडी येथे साऊ महोत्सव २०२३ या कार्यक्रम सोहळ्यात विद्यार्थीभिमुख मुख्याध्यापक हा पुरस्कार गणेश उदावंत यांना सिटू संघटनेचे राज्याध्यक्ष प्रा.बी.टी.बांबरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
गेल्या नऊ वर्षापासून हिरडपाडा आश्रमशाळेचा इ.१० वी चा निकाल १००% लागला आहे.त्याचप्रमाणे नव्याने सन २०१९ पासून सुरू असलेल्या उच्च माध्यमिक विभागातील १२ वी कला व विज्ञान या दोन्ही शाखेचा निकाल मागील तीन वर्षापासून १००% लागला आहे. संस्था व शाळा प्रशासन यांच्याकडून अनेक विद्यार्थी कला,क्रीडा क्षेत्रामध्ये देखील उंच गगन भरारी घेत आहेत.उत्तम शालेय प्रशासक म्हणून जव्हार प्रकल्प विभागातील एकूण १८ अनुदानित आश्रमशाळेंपैकी विद्यार्थीभिमुख मुख्याध्यापक म्हणून निवड झाल्याने स्थानिक परिसरातून संस्था अध्यक्ष,सर्व संस्था पदाधिकारी,शाळेचे समन्वयक,शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व पालक यांच्याकडून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.