
दैनिक चालू वार्ता जव्हार प्रतिनिधी-दिपक काकरा.
जव्हार:- मराठी भाषेतील आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने जव्हार पत्रकार संघाने जव्हारच्या शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या कार्यक्रमात जव्हारच्या पतंगशाह उपजिल्हा रुग्णालयाचे अधिक्षक डॉ.रामदास मराड यांना प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित करून दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकरांना अभिवादन करण्यात आले.सुरुवातीला अतिथींच्या उपस्थितीत दर्पणकार जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उपस्थित सर्व पत्रकार बंधूंचे गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी डॉ.मराड यांनी आपले मनोगत व्यक्त करताना पूर्वीचा पत्रकार आणि आताचा पत्रकार यामध्ये खूप बदल झाला असून आधुनिक पत्रकार हा समाजाचा आरसा तर लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे.पत्रकार बांधवांमुळेच अनेक समस्यांना वाचा फुटून ग्रामीण भागाचा विकास होण्यास मदत होत असते.तसेच या कार्यक्रमात पत्रकार ॲड.पारस सहाणे यांनी वकिलीची पदवी प्राप्त व पत्रकार मनोज कामडी यांची ग्रामपंचायत सदस्य पती निवड झाल्यामुळे उपस्थित पत्रकार संघातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.