दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : शहरात व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांना व्यवसाय परवाना अनिवार्य करण्यात आला आहे. आगामी १५ जानेवारी पासून ज्यांच्याकडे परवाना आढळून येणार नाही, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल असा इशारा महापालिका आयुक्त तथा प्रशासक तृप्ती सांडभोर यांनी दिला आहे.
परभणी शहर महापालिका क्षेत्रात लाखोंच्या संख्येने आस्थापने, सर्व प्रकारचा व्यवसाय करणारी दुकाने, लहान मोठ्या कंपन्या, उद्योग, व्यवसाय कार्यरत आहेत. परंतु त्यांच्याकडे तथा बहुतांश व्यवस्थापनाकडे व्यवसाय परवाना उपलब्ध नसल्याचे समजते. तो परवाना अनिवार्य असून आगामी १५ जानेवारी पासून तसा परवाना उपलब्ध नसल्यास किंवा आढळून न आल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली जाईल असा इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे.
या प्रकरणी महाराष्ट्र शासनाच्या विहित नमुन्यात नमूद केल्याप्रमाणे विशेष माहिती वेबसाईटवर दिलेल्या लिंकवर उपलब्ध होऊ शकेल किंवा कोणाला काही अडचण निर्माण झाल्यास महापालिकेच्या प्रभाग समिती अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आपल्या व्यवसायाचा प्रकार, लागणारी कागदपत्रे व शुल्क याविषयीच्या माहितीसाठी सहकार्य मिळू शकेल असेही महापालिकेतर्फे सूचित केले आहे.
महापालिका क्षेत्रात व्यवसाय करण्यासाठी परवाना हा अनिवार्यच असतो. त्यात जाणीवपूर्वक दूर्लक्ष केले गेल्यास किंवा कायद्याचे उल्लंघन करुन नियमांची पायमल्ली केल्यास ज्ञानेंद्रियांना कठोर अशी दंडात्मक कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी असे आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे.


