
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
मुंबई : शिवसेनेमध्ये पडलेल्या अभूतपूर्व फुटीनंतर उद्धव ठाकरे यांचे पक्षप्रमुखपद संकटात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. येत्या २३ जानेवारी रोजी उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदाचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपणार आहे.
त्यामुळे, पक्षांतर्गत निवडणुकांची परवानगी द्यावी अथवा निकाल लागेपर्यंत पक्षप्रमुख पदाची मुदत वाढवावी, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केल्याची माहिती शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी आज दिली.
शिवसेना, पक्षाचे धनुष्यबाण चिन्ह नेमके कुणाचे याचा वाद सर्वोच्च न्यायालय आणि केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुरू आहे. त्यातच आता पक्षप्रमुखपद अडचणीत आल्याने शिवसेनेच्या ठाकरे गटाची लढाई अवघड झाली आहे.
निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार पार पडलेल्या पक्षांतर्गत निवडणुका आणि राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत २०१८ मध्ये उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पक्षप्रमुखपदी दुसऱ्यांदा निवड करण्यात आली होती. पाच वर्षांसाठी करण्यात आलेल्या या निवडीची मुदत येत्या २३ जानेवारी रोजी संपणार आहे.
दरम्यानच्या काळात एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या बंडाळीमुळे शिवसेनेत उभी फूड पडली आहे. या फुटीनंतर पक्षावर ताबा मिळविण्यासाठी शिंदे गट आणि ठाकरे गटात न्यायालयीन लढा सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख पदाचा कार्यकाळ संपत आल्याने ठाकरे गटाने आता निवडणूक आयोगाकडे परवानगी मागितली आहे.
यासंदर्भात अनिल देसाई म्हणाले, ”उद्धव ठाकरे यांचा पक्षप्रमुखपदाचा कार्यकाळ संपण्याआधी पक्षांतर्गत निवडणुका घेऊ देण्याची मागणी आमच्या वकीलांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. यात राष्ट्रीय कार्यकारणीची निवडही आहे.
जर आयोगाला पक्षांतर्गत निवडणुका घेण्यावर काही आक्षेप असेल, तर त्यांनी निर्णय होईपर्यंत उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुखपदाची मुदत वाढवावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.”