दैनिक चालु वार्ता जव्हार प्रतिनिधी-दिपक काकरा.
जव्हार:- निसर्गाने मुक्तहस्तांनी रंगांची उधळण करीत जव्हारच्या सृष्टी सौंदर्यामध्ये भर घातली आहे.थंड हवेचे ठिकाण असलेल्या या भागामध्ये शेती आणि शेतीशी संबंधित व्यवसाय या भागात करण्यात येत आहेत.जंगली फुलांची झाडे वृक्षतोडीमुळे कमी झाले आहेत याचा परिणाम मधाचे पोळे तयार करणाऱ्या मधमाशांवर झाल्याने मधमाशांचे अस्तित्व धोक्यात येत चालले आहे.परागीभवनातून शेती उत्पन्न ३० टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे काम मधमाशा करतात.या कामातून मधमाशा अन्नाचा प्रमुख स्त्रोत निर्माण करतात.मात्र अन्नसाखळीत प्रमुख स्थान असलेल्या मधमाशांचे अस्तित्वच आता धोक्यात आले आहे.याला कारणीभूत म्हणजे जंगलांचे कमी होणारे प्रमाण,पिकांवर होणारी रासायनिक फवारणी,निसर्ग आणि चक्रीवादळे,मोबाईल टॉवर्समधील विद्युत चुंबकीय लहरी यामुळे मधमाशांवरील संकट आता तीव्र स्वरुपात जाणवत आहे.त्यामुळे नैसर्गिक अधिवासात तयार झालेली मधाची विक्री करणाऱ्या आदिवासी बांधवांच्या उपजीविकेवरही परिणाम होत आहे.
एपिस मेलीफेरा व एपिस सेरेना या दोन जातीच्या मधमाशा पाळीव झाल्या आहेत.तसेच एपीस डॉसॉटा,प्लोरिया या जातीच्या मधमाशा असून अन्नाचा अभाव,प्रतिस्पर्धी माशांचे हल्ले,आग,जंगलातील वणवे,मोबाईल टॉवर्समधील विद्युत चुंबकीय लहरी, पिकांवरील रासायनिक कीटकनाशक फवारणी इत्यादींमुळे घटल्या आहेत.तालुक्यातील वनवासी,पिंपळशेत,हाडे या जंगल असलेल्या पट्ट्यात विविध प्रकारच्या मधमाशांचे प्रमाण जास्त होते.ते आता दिवसेंदिवस कमी होत आहे.कारण मधमाशा जिथे अन्नाचा स्त्रोत भक्कम आहे अशाच ठिकाणी आपले पोळे बनवतात.त्यांचे अन्न म्हणजे मकरंद किंवा परागकण,त्यासाठी त्या परिसरात फुलांचे प्रमाण जास्त असणेही आवश्यक आहे.मात्र नैसर्गिक अधिवासात अशा फुलांचे प्रमाण कमी होत चालले आहे.त्यातच कमी दिवसांत जास्त पीक देणाऱ्या रासायनिक कीटकनाशक फवारणीकडे शेतकऱ्यांचा कल वाढतो आहे.
जंगलात राहणाऱ्या आदिवासी बांधवांचे मध संकलन करणे हा प्रमुख व्यवसाय आहे.आतापर्यंत अनेक पिढ्या मध संकलनावर उपजीविका करत होत्या.मात्र आता सततच्या जंगलतोडीमुळे मध संकलन करण्याचे प्रमाण खूपच कमी झालेले असल्याने हा व्यवसाय संकटात आला आहे.निसर्गनिर्मित मध हे पूर्णपणे शुद्ध आणि आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक असते.तालुक्यात कृत्रिम रित्या मधुमक्खी पालन प्रशिक्षण राबवून एक चांगल्या प्रकारे रोजगार उपलब्ध करण्यासाठी वृक्ष लागवड करून संवर्धन करणे ही काळाची गरज असल्याचे मत शेतकरी वर्गा कडून व्यक्त केले जात आहे.


